बोधेगाव : केदारेश्वर यात्रेवर दुष्काळाचे सावट; भाविकांची तुरळक गर्दी

बोधेगाव : केदारेश्वर यात्रेवर दुष्काळाचे सावट; भाविकांची तुरळक गर्दी
Published on
Updated on

बोधेगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : बोधगावजवळील नागलवाडी येथील श्री क्षेत्र काशी केदारेश्वराच्या श्रावण महिन्यातील तिसर्‍या सोमवारी भरणार्‍या मोठ्या यात्रेवर यंदा दुष्काळाचे सावट पाहायला मिळाले. यात्रेत यंदा भाविकांची तुरळक गर्दी होती. वाहने थेट देवस्थानपर्यंत जात होती. शेवगाव तालुक्यातील बोधेगावपासून दक्षिणेला सह्याद्री पर्वताच्या रांगेत सुमारे आठ किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र भगवान गडाच्या पायथ्याशी नागलवाडी येथील श्री क्षेत्र काशी केदारेश्वर देवस्थान आहे.

तिसर्‍या श्रावण सोमवारी येथे दरवर्षी मोठी यात्रा भरते. शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. भगवान गडाजवळील खरवंडी कासारपासून वाहनांची रिघ लागते. तर, बोधेगावपासून भाविकांच्या चारचाकी, दुचाकी वाहनांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळे दरवर्षी तीर्थक्षेत्रापासून एक किलोमीटर अंतरावरच वाहने अडविली जातात. बोधेगावकडे थेट नागलवाडीच्या घाटीपासून तर, भगवान गडापासून वाहतूक ठप्प होते. म्हणजे दोन्ही बाजूंनी जवळपास दोन ते तीन किलोमीटर अंतर भाविकांना पायी जावे लागते.

परंतु, सोमवारी मात्र तशी यात्रा भरली नाही. वाहने थेट देवस्थानपर्यंत जात होती. भाविकांची तुरळक गर्दी होती. यात्रेवर दुष्काळाचे सावट स्पष्ट जाणवत होते. या परिसरात पावसाने दडी मारल्याने कपासीचे पीक जळाले आहे. जेथे तग धरून आहे, तेथे पिकाने जमीन सोडली नाही. सर्वच खरीप पिकांची वाढ खुंटली आहे. विहिरींनी तळ गाठला आहे.

परिसरातील नदी, नाले, बंधारे, पाझर तलाव, शेततळे कोरडेठाक आहेत. मजुरांच्या हाताला काम नाही. शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. उधारी-उसनवारी बंद झाली आहे. त्यामुळे सामान्यांच्या हातात पैसा नसल्याने, यात्रेला जाणारे अख्खे कुटुंब आज यात्रेत कोठेच दिसले नाही. हालवकरी, स्टेशनरी, बांगड्यावाले, खेळणीवाले व पानफूल विक्रेत्यांना ग्राहकांची गर्दी आवरत नसते. त्यांना काल ग्राहकांची वाट पाहावी लागत होती. देवस्थानचे मठाधिपती बाबागिरी महाराज यांनी भाविकांना सर्व सुविधा पुरवल्या होत्या. पण दुष्काळी परिस्थितीने अनेकांनी यात्रेकडे पाठ फिरवून घरूनच देवाला हात जोडले.

रामायणकालीन दंडकारण्याचा परिसर

श्री काशी केदारेश्वर देवस्थानला देवभूमी संबोधले जाते. रामायणकालीन दंडकारण्याचा हा परिसर आहे. खोल दरीमधे महादेवाचे मंदिर आहे. येथेच वाल्मिकऋषींचा आश्रम आहे. येथे पुरातन रसायनक नार्गाजुनाचे वास्तव्य होते. धौंम्यऋषी, वाल्मिकऋषी, भृंगऋषी, शिंगुस्तऋषी इत्यादी सप्तऋषींचे वास्तव्य आजही या परिसरात आहे, अशी भाविकांची श्रध्दा आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news