रत्नदीपच्या डॉ. भास्कर मोरेला अखेर अटक; जिल्हाधिकाऱ्यांकडून होणार चौकशी

रत्नदीपच्या डॉ. भास्कर मोरेला अखेर अटक; जिल्हाधिकाऱ्यांकडून होणार चौकशी

जामखेड : पुढारी वृत्तसेवा : विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यापासून रत्नदीप मेडिकल व रिसर्च सेंटरचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे पसार होता. तो गेल्या सहा दिवसांपासून पोलिसांना चकवा देता होता. बुधवारी रात्री आरोपी डॉ. मोरे याला भिगवण (ता. इंदापूर) येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने ताब्यात घेतले असून, लवकरच जामखेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली. संशयित आरोपी डॉ. भास्कर मोरे याला अटक करण्यासाठी जामखेड पोलिसांचे तीन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती. पथकाने आरोपी मोरे याच्या शोधासाठी राज्यभर विविध ठिकाणी छापे घातले होते.

दरम्यान, आरोपीच्या अटकेसाठी आमदार रोहित पवार, आमदार राम शिंदे यांनी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह पोलिस दलाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी संपर्क करून पाठपुरावा केला होता. त्यात आरोपी डॉ. भास्कर मोरे याच्यावर वन्यजीव कायद्यानुसार देखील गुन्हा दाखल असल्याने पोलिस त्याच्या शोधात होते. त्यामुळे पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांच्या रोषास सामोरे जावे लागले.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाला आरोपी डॉ. मोरे भिगवण (ता. इंदापूर, जि. पुणे) येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने सायंकाळी आरोपी मोरे याला ताब्यात घेतले. त्याला उद्या जामखेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
आमदार प्रा. राम शिंदे यांनी काल (बुधवारी) आंदोलनस्थळी जाऊन उपोषणास बसलेल्या विद्यार्थ्यांची कैफियत ऐकून घेतली.

विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही, यासाठी तीनही विद्यापीठांच्या संपर्कात असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले. संस्थेच्या सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशीही त्यांनी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी संस्थेच्या विरोधातील आंदोलनाची गंभीर दखळ घेतली आहे. त्यामुळे सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे असल्याचे आमदार शिंदे यांनी विद्यार्थ्यांना आश्वस्त केले.

महाविद्यालयात नव्हे तुरुंगात..

रत्नदीपच्या वैद्यकीय महाविद्यालयात नव्हे,तर आम्ही तुरुंगात जात होतो. महाविद्यालयात डॉ. मोरे विद्यार्थ्यांची मानसिक पिळवणूक करीत होते, असा पाढा विद्यार्थ्यांनी आमदार शिंदे यांच्यासमोर वाचला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यभूमीत महिला सुरक्षित नाहीत, ही मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे आम्हाला न्याय द्या, असे साकडे विद्यार्थ्यांनी घातले. आमच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणार्‍या डॉ. मोरे याला अटक झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केलेे.

तरच आंदोलन मागे घेऊ : भोसले

लैंगिग अत्याचार करणारा डॉ. भास्कर मोरे यांच्यावर कारवाई व रत्नदीपच्या सर्व परवानग्या रद्द करतानाच विद्यार्थ्यांचे समायोजन व विद्यार्थ्यांना विद्यापीठाचेे पत्र आल्याशिवाय आंदोलन घेणार नसल्याचे भोसले यांनी सांगितले.

मंगल कार्यालयातच वसतिगृह

रत्नदीप महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे वसतिगृह एक मंगल कार्यालय असून, विद्यार्थ्यांकडून वर्षाला निवासाचे शुल्क दीड लाख रुपये आकारली जाते. ते मंगल कार्यालय ते महाविद्यालयाचे अंतर अर्धा किमी असताना देखील ये- जा करण्यासाठी 30 हजार रुपये आकारले जायचे. .त्यामुळे विद्यार्थ्यांची लूट होत असताना याकडे प्रशासनाने दुर्लक्ष का केले, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व दीपक केसरकर यांच्याशी आमदार राम शिंदे यांनी दूरध्वनीवरून संवाद साधता रत्नदीपवर कारवाई करण्याबाबत संबंधित अधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्याचे मंत्र्यांनी विद्यार्थ्यांना आश्वासन दिले.

मोबाईल व सीमकार्ड बदलले

आरोपी डॉ. मोरे गेल्या सहा दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. त्यात काळात त्याने विविध मोबाईलचा वापर केला. तर अनेक सीमकार्डही बदल्याचे समोरे आले आहे. आरोपीच्या अटकेची माहिती मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news