..अन्यथा अधिकारी, कर्मचार्‍यांना प्रवेशबंदी : भाजप उद्योग आघाडी | पुढारी

..अन्यथा अधिकारी, कर्मचार्‍यांना प्रवेशबंदी : भाजप उद्योग आघाडी

शिरूर : पुढारी वृत्तसेवा : शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतीमाल घेऊन येणार्‍या शेतकर्‍यांची ससेहोलपट थांबवावी, आवारात तातडीने सावली, पिण्याच्या पाण्याची सोय करणे, शेतकर्‍यांना रस्त्यावर माल विकण्याची पद्धत बंद करावी; अन्यथा अधिकारी, कर्मचार्‍यांनाच बाजार समितीच्या आवारात प्रवेश करण्यासाठी विरोध केला जाईल. तसेच भाजीबाजार व भुसार मालाचा बाजार दुसरीकडे सुरू केला जाईल. त्यास बाजार समिती जबाबदार राहील; असा इशारा भाजप उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय पाचंगे यांनी दिला आहे. या संदर्भातील निवेदन बाजार समितीचे सचिव यांना नुकतेच देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, मंगळवारी (दि. 12) शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतीमाल घेऊन येणारे शेतकरी अक्षरशः उन्हात आपला शेतीमाल घेवून बसले होते.

शेतकरी आपला माल मिळेल त्या वाहनाने घेऊन येतो. मात्र त्यांच्या वाहनास पहाटे 4 वाजण्याच्या आत बाजार समितीच्या आवारात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे मुख्य रस्त्यावरून शेतकर्‍यांना स्वतः खांद्यावर घेऊन माल आत वाहून नेण्याची वेळ येते किंवा हमालीचे पैसे देऊन माल आत वाहून न्यावा लागतो. दुसरीकडे भुसार मालाच्या व्यापार्‍यांची वाहने थेट कधीही आडतीच्या समोर नेण्यास परवानगी आहे. बाजार समितीची भूमिका शेतकर्‍यांवर अन्याय करणारी आहे. भाजीपाला बाजार रस्त्यावर भरवला जातो. त्यामुळे व्यापारी, दुकानदारांनाही त्रास सहन करावा लागतो. बाजार समितीचे कर्मचारी तर अक्षरशः मालक असल्यासारखे वागत असल्याच्या तक्रारी आहेत. शेतकर्‍यांना प्रवेश देतात म्हणजे उपकारच करतात असा आव आणत आहेत. ही मानसिकता व शेतकर्‍यांवरचा अन्याय येत्या
8 दिवसांत बंद करावा, असे निवेदनात नमूद केले आहे.

कमीत कमी पाणी व निवार्‍याची सोय करा

एक वर्षापूर्वी या सर्व विषयांवर दै. ’पुढारी’ने आवाज उठविला होता. मात्र बाजार समितीने शेतकर्‍यांसाठी काहीच केले नाही. फक्त व्यापार्‍यांचे हित पाहणार्‍या या संस्थेने ज्यांच्या नावावर ही बाजार समिती सुरू झाली, त्यांना कमीत कमी पाणी व निवार्‍याची सोय करावी, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा

 

Back to top button