अधिकार्‍यांनो, गोदा आवर्तनात समन्वय ठेवा; मंत्री विखे पा यांचे निर्देश

अधिकार्‍यांनो, गोदा आवर्तनात समन्वय ठेवा; मंत्री विखे पा यांचे निर्देश

Published on

कोपरगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : गोदावरी लाभक्षेत्रातील पाण्याच्या आवर्तनाबाबत अधिकार्‍यांनी समन्वय ठेवून सुयोग्य नियोजन करावे, आवर्तनाच्या काळामध्ये असलेल्या आदेशाप्रमाणे वीज भारनियमाच्या वेळापत्रकाचेही पालन व्हावे, उपलब्ध पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची अधिकार्‍यांसह कर्मचारी व स्थानिक कार्यकर्त्यांनी दक्षता घ्यावी, अशा सुचना करीत, निळवंडे धरणातूनही पाणी सोडण्याचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी येथे बोलताना दिले.

गोदावरी व प्रवरा धरण समुहाच्या आवर्तनाच्या नियोजनाचा आढावा पालक मंत्री विखे पा. यांनी अ. नगर व नाशिक येथील जलसंपदाच्या अधिकार्‍यांकडून घेतला. यावेळी नाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, जलसंपदाच्या कार्यकारी अभियंता सोनाली शहाणे, अधिक्षक अभियंता आमले, कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक स्वाती भोर, नाशिकचे उपविभागीय पोलिस अधिकारी गोकावे, प्रांताधिकारी माणिकराव आहेर, तहसीलदार अमोल मोरे, वीज वितरणचे अभियंता पाटील, कार्यकारी अभियंता बडगुजर, निळवंडे प्रकल्पाचे अभियंता हाफसे आदी उपस्थित होते.

मंत्री विखे पा. यांनी गोदावरी व प्रवरा धरण समुहातील पाण्याचा आढावा घेत आवर्तन नियोजनाची वस्तुस्थिती अधिकार्‍यांकडून जाणून घेतली. पावसाचे प्रमाण कमी असल्याने यंदा प्रथमच ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यातच आपल्याला धरणातून सिंचनासह पिण्यासाठी पाणी देण्याची परिस्थिती उद्भवली. यामुळे उपलब्ध पाण्यातून आपल्याला आवर्तनाचे नियोजन सुयोग्य पध्दतीने करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पिकांना पाणी मिळणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी धरण समुहात शेवटच्या शेतकर्‍याला पाणी मिळण्याच्या दृष्टीने जलसंपदाचे नियोजन आवश्यक आहे. यासाठी चार्‍यांमधील अडथळे व्यवस्थितपणे दुर करावे. आवश्यक ठिकाणी जेसीबीसह अन्य साहित्य व मनुष्यबळाची मदत डॉ. विखे पा. साखर कारखान्याच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्याची ग्वाही त्यांनी दिली. वीज वितरणच्या अधिकार्‍यांनी भारनियमनाबाबतचे नियोजन चांगल्या पध्दतीने हाताळावे, शेतकर्‍यांना कुठेही अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी. बेकायदेशिरपणे पाणी उपसले जाणार नाही, याकरीता पोलिस प्रशासनाची मदत घेण्याचे त्यांनी बैठकीत सुचित केले.

निळवंडेतून सोडणार्‍या पाण्याचा घेतला आढावा

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी निळवंडे धरणातून सोडण्यात येणार्‍या पाण्याचा आढावा घेतला. कालव्यातून तातडीने पाणी देण्याबाबत नियोजन करण्याच्या सुचना त्यांनी केल्या, मात्र अकोले तालुक्यात असलेल्या कालव्यातील कामांच्या त्रृटी दुरुस्त करण्याचे काम सुरु असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले, परंतू ही कामे 10 दिवसांत पूर्ण करुन, पाणी देण्याबाबतच्या सुचना पालक मंत्री विखे पा. यांनी निळवंडे प्रकल्पाच्या अधिकार्‍यांना दिल्या.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news