श्रीरामपूर नाही, तर कुठेच नाही; जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी कृती समिती

श्रीरामपूर नाही, तर कुठेच नाही; जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी कृती समिती

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : सरकारने श्रीरामपूर जिल्हा घोषित करावा आणि येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवस्मारक उभारण्याच्या मागणीकरिता श्रीरामपूर जिल्हा कृती समिती व शिवप्रहारच्या वतीने शनिवार (दि. 20) मोर्चा काढण्यात येणार आहे. श्रीरामपूर हाच नवीन जिल्हा होणार; नाहीतर विभाजन होणार नाही आणि इतर कोणत्याही ठिकाणी जिल्हा मुख्यालय होऊ देणार नाही, असा निर्धार दोन्ही संघटनांनी व्यक्त केला आहे.

सकाळी दहा वाजता आझाद मैदान, लोकमान्य टिळक वाचनालयासमोर, मेनरोड, श्रीरामपूर शहर येथून हा मोर्चा जाईल. आझाद मैदानातून निघून मेन रोडमार्गे भगतसिंगचौक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक, गिरमे चौक, तुळजाभवानी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा गांधी पुतळा, श्रीराम मंदिर चौक असा जाणार आहे. मेनरोडवरील श्रीराम मंदिर चौकामध्ये मोर्चाचा समारोप होणार आहे. पूर्णपणे लोकशाही मार्गाने होणार्‍या या मोर्चाच्या माध्यमातून सरकारचे व प्रशासनाचे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवस्मारकासह (शिवपुतळा) श्रीरामपूर जिल्हा व्हावा या मागणीकडे लक्ष वेधण्यात येणार आहे.

नगर जिल्ह्याचे विभाजन झाले तर श्रीरामपूर हाच नवीन जिल्हा होणार; नाहीतर जिल्हा विभाजन होणार नाही आणि इतर कोणत्याही ठिकाणी जिल्हा मुख्यालय होऊ देणार नाही, असे श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे ठाम मत असल्याचे समितीचे अध्यक्ष प्रताप (नाना) भोसले यांनी सांगितले. शिवप्रहार प्रतिष्ठानचे प्रमुख माजी पोलिस अधिकारी सूरजभाई आगे यांनी सांगितले, की प्रभू श्रीरामांच्या नावाने श्रीरामपूर या नावाने भारतात जिल्हा अस्तित्वात नाही. तरी हिंदुस्थानातला श्रीरामांच्या नावाचा पहिला जिल्हा होण्याचा मान श्रीरामपूरला मिळावा यासाठी आम्ही लोकशाही मार्गाने मोर्चा काढत आहोत.

बिगरराजकीय नेतृत्वाखाली होणार्‍या या मोर्चात सर्वसामान्य श्रीरामपूरकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे. गेल्या चार महिन्यापासून चालू असलेल्या श्रीरामपूर जिल्हा मोहिमेला देखील श्रीरामपूरकरांचा भरघोस पाठिंबा मिळत आहे. प्रचंड मोठ्या संख्येने श्रीरामभक्त-शिवभक्त या मोर्चामध्ये सामील होणार असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news