

गेवराई(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा ते गेवराई रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्याचे तातडीने मजबुतीकरण व डांबरीकरण करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप सरोदे यांनी दिला आहे. पाच वर्षांपूर्वी या रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती. तरीदेखील हा रस्ता आता उखडला आहे. या कामाची चौकशीही करण्याची मागणी सरोदे यांनी केली आहे. रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. जागोजागी खड्डे पडल्याने वाहने चालविताना चालकाला कसरत करावी लागते.
नेवासा फाट्यापासून करडकवाडी, पिचडगाव, म्हसले, बाभूळखेडे, दिघी, गोंडेगाव, गेवराई, पिंप्री शहाली, रांजणी दहिगाव आदी गावांतील नागरिकांचा तालुक्याशी दररोजचा संपर्क येत असतो. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. त्याशिवाय दहिगावला जाणारे प्रवासी याच रस्ताचा वापर करतात. रस्ता 20 किलोमीटर अंतराचा आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना प्रवास करताना हाल सहन करावे लागतात. दुचाकी व चारचाकी वाहनांबरोबरच या रस्त्याने अवजड वाहनांची वाहतूकही असते. त्यामुळे डांबरीकरण नेहमीच उखडले जात आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात अपघात होत आहेत. महिला रुग्णांना या रस्त्यावरून प्रवास करणे खूप जिकिरीचे ठरत आहे. अनेक ठिकाणी रस्ता उखडल्याने माती व धुळीचा सामना करावा लागतो. रस्ता कधी दुरुस्त होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे
या रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या साईडपट्ट्या तुटल्या आहेत. दोन वाहनांना जाताना अपघात होतात. रस्ता उंच व साईड पट्ट्यांची बाजू खोलवर असल्याने वाहन चालताना नाकीनऊ येते.
हेही वाचा