राष्ट्रवादी जामखेडमध्ये फिरविणार भाकरी! पदाधिकार्‍यांचे राजीनामे

राष्ट्रवादी जामखेडमध्ये फिरविणार भाकरी! पदाधिकार्‍यांचे राजीनामे

जामखेड; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकतेच पक्षातील पदाधिकारी यांची भाकरी फिरविण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त खासदार सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रीय स्तरावर संधी देण्यात आली आहे. त्याचीच रेघ ओढत आमदार रोहित पवार हेही कर्जत-जामखेडमध्ये पक्षांतर्गत मोठे बदल करण्याच्या तयारीत आहेत. यासाठी पदाधिकार्‍यांनी नुकतेच राजीनामे दिले आहेत. त्यामुळे कर्जत – जामखेड मधील पदाधिकारी यांची लवकरच नियुक्ती होणार असल्याच्या चर्चा सुरु झाली आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी पदाधिकारी निवड करण्यात आली होती. यांनतर स्थानिक संस्थाच्या निवडणुका, बाजार समिती निवडणुका, त्यामुळे काहीकाळ पदाधिकार्‍यांच्या निवडी रखडल्या होत्या. त्यानुसार आमदार पवार यांनी नुकतीच हळगाव येथील कारखान्यावर पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. त्यामध्ये सर्वच पदाधिकार्‍यांनी कार्यकाळ पूर्ण झाल्याचे कारण देत राजीनामे दिले. त्यामुळे नवीन पदाधिकार्‍यांच्या निवडी करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यावर आमदार पवार यांची 'वेट अ‍ॅण्ड वॉच' अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे पदाधिकारी निवडीसाठी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

आमदार पवार यांना गेल्या 4 वर्षांचा पदाधिकार्‍यांचा अनुभव आला असून, पक्षासाठी कोण किती काम करत आहे, याची सर्व माहिती त्यांच्याकडे आहे. त्यामुळे प्रामाणिक काम करणार्‍यांना न्याय मिळणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद आदींच्या निवडणुका होणार आहेत. यादृष्टीने कार्यकर्त्यांना न्याय द्यावा लागणार आहे. त्यामुळे आमदार पवार हे पक्षांतर्गत मोट बांधण्यासाठीच पदाधिकारी निवड करणार असल्याचे बोलले जात आहे. या निवडीमध्ये ज्येष्ठ व युवा कार्यकर्त्यांचा मेळ घालण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

मुदत संपल्याने राजीनामे : दत्तात्रय वारे

पक्षाच्या घटनेनुसार 3 वर्षांचा पदाचा कार्यकाळ असून, पदाची मुदत संपून 1 वर्ष झाले होते. त्यामुळे सर्व पदाधिकार्‍यांनी राजीनामे दिले आहेत. लवकरच नवीन पदाधिकार्‍यांची नियुक्ती होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे यांनी 'दै. पुढारी'शी बोलताना सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news