

नगर : पुढारी वृत्तसेवा : बुर्हाणनगर येथील श्री अंबिका तुळजाभवानी देवी मंदिरात रविवार (दि.15) पासून सुरू होणार्या शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. यावर्षीपासून देवीच्या मुख दर्शनाची स्वतंत्र व्यवस्था मंदिरात करण्यात आली आहे.
मंदिर व मंदिर परिसराची आकर्षक सजावट करण्याचे काम पूर्ण झाले आहे. मंदिराची रंगरंगोटी करून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. जिल्ह्यासह राज्यातून येणार्या भाविकांची संख्या जास्त असल्याने यावर्षी नवरात्र उत्सवात प्रथमच भाविकांना दिवसातील 21 तास तुळजाभवानी देवीचे दर्शन घेता येणार आहे. दर्शन रांगेतून देवीच्या दर्शनास बराच वेळ लागत असल्याने भाविकांचा वेळ वाचवा यासाठी यावर्षी पासून देवीच्या मुख दर्शनाची स्वतंत्र व्यवस्था मंदिरात करण्यात आली आहे, अशी माहिती मंदिराचे मुख्य पुजारी अॅड.विजय भगत यांनी दिली.
संबंधित बातम्या :
मंदिर प्रमुख अॅड.अभिषेक भगत म्हणाले, श्री क्षेत्र तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीच्या पालखीचा मान बुर्हाणनगर येथील भगत कुटुंबियांच्या मंदिराला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री अंबिका तुळजाभवानी देवी मंदिरात दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात नवरात्रोत्सव साजरा करण्याची शेकडो वर्षांची वैभवशाली परंपरा आहे. यावर्षीच्या नवरात्रोत्सवात 10 दिवस भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
रविवार दि.15 ऑक्टोबर रोजी अश्विन शुद्ध प्रतिपदेला सकाळी 7 वाजता मंदिरातील तुळजाभवानी देवीची अभिषेक महापूजा व आरती होईल. सकाळी 11 वाजता शोभायात्रा, ध्वजारोहणाने विधिवत घटस्थापना होणार आहे. सोमवार दि.16 रोजी सकाळी 7 वाजता देवीची नित्यपूजा व महाआरती होईल. रात्री 10 वाजता संत जनकोजी भगत यांच्या तुळजाभवानी पालखीचे आगमन मंदिरात होईल. मंगळवार दि.17 रोजी तिसर्या माळेनिमित्त यात्रा भरणार आहे. सकाळी नित्यपूजा झाल्यावर 10 वाजता संत जनकोजी भगत यांच्या तुळजाभवानी पालखीची मिरवणूक मंदिर परिसरात निघेल.
रात्री 10 वाजता महाआरती होईल. बुधवार दि.18 रोजी सकाळी 10 आजता नित्यपूजा, सायंकाळी 6 वाजता संरक्षण प्रशिक्षण व रात्री 10 वाजता महाआरती. गुरुवार दि.19 रोजी ललिता पंचमी निमित्त सकाळी 7 वाजता देवीची मयूर आसन अलंकार पूजा करण्यात येणार आहे. सायंकाळी 6 वाजता कुंकुमार्चन व रात्री 10 वाजता महाआरती. शुक्रवार दि.20 रोजी सकाळी नित्यपूजा, सायंकाळी 6 वाजता माताकी चौकी भजनाचा कार्यक्रम व रात्री 10 वाजता महाआरती. शनिवार दि. 21 सकाळी नित्यपूजा, सायंकाळी 6 वाजता नारायणी कीर्तन व रात्री महाआरती. रविवार दि.22 रोजी दुर्गाष्टमी निमित्त देवीची महिषासूरमर्दिनी अलंकार पूजा, दुपारी 4.00 वाजता वैदिक होम, झोपडी पेटवण्याचा कार्यक्रम व भवानी तलवार पूजन होणार आहे. सोमवार दि. 23 रोजी देवीची नित्यपूजा व दर्शन, मंगळवार दि. 24 रोजी विजयादशमी निमित्त पहाटे 4 वाजता देवीची महापूजा, घटोत्पाथनाची पूजा, सायंकाळी 7 वाजता सार्वत्रिक सीमोल्लंघन, शनिवार दि.28 रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सकाळी 7 वाजता देवीची महापूजा, सायंकाळी 7 वाजता पलंगाचा छबिना व महाआरतीने नवरात्र उत्सवाची सांगता होणार आहे