सत्ता असताना विरोधक झोपले, सत्ता गेल्यावर जागे झाले : आ. मोनिका राजळे

सत्ता असताना विरोधक झोपले, सत्ता गेल्यावर जागे झाले : आ. मोनिका राजळे

पाथर्डी तालुका: पुढारी वृत्तसेवा :  पाथर्डी तालुक्यातील करोडी ते टाकळीमानूर रस्त्याचे काम मंजूर झालेले आहे. तांत्रीक बाबीमुळे ठेकेदारास कार्यारंभ आदेश मिळाला नसून ठेकेदाराने कागदपत्राची पुर्तता केल्यावर प्रशासकीय आदेश मिळून रस्त्याच्या कामाला लगेच सुरवात होईल. मात्र आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधक ज्या रस्त्याचे काम मंजुर झाले, त्यासाठी रस्तारोको आंदोलन करून कामाचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका आमदार मोनिका राजळे यांनी विरोधकांवर केली आहे. सत्ता आसताना झोपलेले विरोधक सत्ता गेल्यावर जागे झाले, अशी ही खरमरीत टिका करत आ. मोनिका राजळे यांनी पलटवार केला.

संबंधित बातम्या :

तालुक्यातील टाकळीमानुर ते करोडी रस्ता मंजुर करण्यात यावा या मागणीसाठी आज महाविकास आघाडीच्यावतीने करोडी येथे रस्तारोको आंदोलन करण्यात आले. त्यास आमदार राजळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जोरदार प्रत्युत्तर दिले. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात तत्कालीन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे या रस्त्यासह मतदारसंघातील इतर रस्त्याचा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत सामावेश करावा यासाठी अनेक वेळा मागणी व पाठपुरावा केला. मात्र त्यांनी एकाही रस्त्यासाठी निधी मंजुर केला नाही. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे मागणी करून पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली.

8 मार्च 2023 रोजी प्रशासकीय मान्यतासुद्धा मिळालेली आहे. ठेकेदार नियुक्तीची प्रक्रिया पुर्ण होऊन मुंडे कंन्ट्रक्शन, शेवगाव या ठेकेदाराला रस्त्याचे काम मिळाले आहे. मात्र काही तांत्रीक कारणामुळे ठेकेदारास कार्यारंभ आदेश होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. संबंधित ठेकेदाराकडून कागदापत्रांची पूर्तता होताच ठेकेदार प्रत्यक्ष कामास सुरुवात करतील. मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे विरोधक राजकीय स्वार्थासाठी मंजुर झालेल्या रस्त्याच्या कामाचे भांडवल करून रस्तारोको आंदोलन तसेच याबाबत सोशल मीडियावर, उलट सुलट चर्चा, पोस्ट व कॉमेंट्स करून मंजुर श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.

अडीच वर्ष राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आसताना आता आंदोलन करणारे विरोधक त्यावेळी सत्तेत होते. त्यावेळी त्यांना तालुक्यातील विकासकामासाठी एक रुपयांचा निधी आणता आला नाही. मात्र तालुक्यातील जनता सुज्ञ आहे. काम करणारे कोण व फक्त राजकीय स्वार्थासाठी आंदोलनाच्या माध्यमातुन स्टंटबाजी करून जनतेला वेठीस धरून दिशाभुल करण्याचा प्रयत्न करणारे कोण, हे जनतेला समजते.

मी सक्षम
राज्यात सध्या महायुतीचे सरकार असून गेल्या दिड वर्षात मतदार संघाच्या विकासासाठी मोठा निधी मिळत आहे. सध्या मतदारसंघात विविध विकासकामे पूर्ण झाली आहेत. अनेक कामे सुरु आहेत. इतर कामे मंजुर आहेत तसेच अनेक कामे प्रस्तावित आहेत. यापुढील काळात केंद्र व राज्य सरकारकडून मतदार संघातील विकास कामासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणण्यासाठी मी सक्षम आहे. विरोधकांनी विकासकामात आडकाठी न आणता सहकार्य करावे अन्यथा मतदारसंघातील सुज्ञ जनता त्यांना आगामी सर्वच निवडणुकीत त्यांची जागा दाखवुन देईल, असा टोला आ. राजळे यांनी लगावला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news