शिर्डी : सुट्ट्यांमुळे साईनगरीत भाविकांचा महापूर

शिर्डी : सुट्ट्यांमुळे साईनगरीत भाविकांचा महापूर

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा :  स्वातंत्र्य दिनानिमित्त सलग तीन दिवस जोडून सुट्ट्या आल्यामुळे शुक्रवारी सायंकाळपासूनच शिर्डीत लाखोंच्या संख्येने भाविकांनी हजेरी लावायला सुरुवात झाली होती. शनिवार आणि रविवारी साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून आलेल्या शिर्डीत साईभक्तांची मांदियाळी बघायला मिळाली असून साईसमाधीच्या दर्शनानंतर भाविकांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सलग सुट्ट्यांमुळे आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र शिर्डीत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. शनिवारी सकाळपासूनच लाखो भाविकांनी साईदरबारी एकच गर्दी केली होती. साईभक्तांचे सुलभ दर्शन व्हावे, यासाठी साईसंस्थान प्रशासनाने उत्तम नियोजन केले आहे.

दोन दिवसांत साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात अंदाजे दिड लाख भाविकांनी भोजन प्रसादाचा लाभ घेतला असल्याचे सांगण्यात आले. यावेळी शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाली होती. यावेळी साईमंदीर प्रवेशद्वार क्रमांक चार समोर आयलव्हसाई याठिकाणी अनेक भाविकांना मोबाईलमध्ये सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. दोन दिवसांत साधारणपणे दोन लाख भाविकांनी साईसमाधीचे मनोभावे दर्शन घेतले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने साईसंस्थानच्या वतीने मंदिरात तसेच परिसरात सुरक्षा व्यवस्था अत्यंत चोख ठेवण्यात आली आहे. मंदीर परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच भाविकांना रक्तदान करण्यासाठी पेढी उभारण्यात आली आहे. भाविकांचा ओघ बघता शहरात वाहनांची गर्दी होऊ नये, यासाठी शनिवारी सकाळपासून वाहतूक रिंगरोडने वळविण्यात आली आहे. तरी देखील शहरातील नगर- मनमाड महामार्गावर सकाळी वाहतुकीची कोंडी पहावयास मिळाली. शहरातील मुख्य मार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाल्याने शहरातील कोणत्या मार्गाने बाहेर निघावे? असा प्रश्न भाविकांना पडला होता. यावेळी नगर- मनमाड महामार्गावर मुख्य चौकात वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिस कर्मचार्‍यांना कसरत करावी लागली.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news