कर्जत/जामखेड : पुढारी वृत्तसेवा : घरकुल योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून कर्जत- जामखेड तालुक्यांनी नाशिक विभागात विक्रमी कामगिरी केली. अमृत महाआवास या योजनेत राज्यभरात घरकुलांचे सर्वाधिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अभियान राबविण्यात आले होते. या अभियानांतर्गत टप्पे ठरवून त्या टप्प्यांवर घरकुलांची कामे पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात आले होते. राज्यभरातील घरकुलांच्या कामांना गती देण्याचा याद्वारे सरकारचा प्रयत्न होता. या अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात कर्जत व जामखेड तालुक्यांनी सरस कामगिरी करीत तब्बल 4039 घरकुले पूर्ण करून नाशिक विभागात बाजी मारली..
2145 घरकुले पूर्ण करून जामखेड तालुका राज्यपुरस्कृत योजनेत प्रथम क्रमांकावर, तर 1894 घरकुले पूर्ण करून कर्जत तालुक्याने प्रधानमंत्री आवास योजनेत तिसरा क्रमांक पटकावला. विक्रमी टप्पा गाठत कर्जत- जामखेड तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सरकारी योजना नागरिकांपर्यंत पोचवण्यासाठी कायमच प्रयत्नशील असतात. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून कर्जत व जामखेडमध्ये बैठका घेऊन त्यांनी वेळोवेळी घरकुलाचे प्रश्न मार्गी लावले. कर्जतचे गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे, जामखेडचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या वारंवार संपर्कात राहून शासकीय पातळीवर व केंद्र सरकारकडेही त्यांनी घरकुलांबाबत पाठपुरावा केला होता. प्रधानमंत्री आवास योजनेत अपात्र ठरलेल्या नागरिकांना राज्यातील इतर योजनेत घरकुल देण्याचाही आमदार पवार यांचा सातत्याने प्रयत्न असतो.
हेही वाचा