नगर : पीकविमा उतरविण्यात कर्जत-जामखेड मतदारसंघ जिल्ह्यात दुसर्‍या क्रमांकावर

नगर : पीकविमा उतरविण्यात कर्जत-जामखेड मतदारसंघ जिल्ह्यात दुसर्‍या क्रमांकावर

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : खरीप हंगामातील पंतप्रधान पीकविमा योजनेमध्ये यंदा शेतकर्‍यांनी विक्रमी सहभाग नोंदविला असून, यामध्ये कर्जत-जामखेड या तालुक्यांनी जिल्ह्यात बाजी मारली आहे. पाथर्डीनंतर कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाने सर्वाधिक पीकविमा अर्ज भरले आहेत. यंदा नगर जिल्ह्यात एकूण 11 लाख 73 हजार 747 शेतकर्‍यांनी अर्ज भरले आहेत. त्यापैकी कर्जत तालुक्यातून 1 लाख 16 हजार 257, तर जामखेड तालुक्यातून 94 हजार 527 शेतकर्‍यांच्या पिकांना विमा कवच मिळाले आहे. दोन्ही तालुक्यात एकूण 2 लाख 10 हजार 789 शेतकर्‍यांनी पीकविमा भरला आहे.

आमदार रोहित पवार यांनी गावागावात जाऊन आपल्या यंत्रणेमार्फत शेतकर्‍यांचे मोफत पीक विमा अर्ज भरून घेतले. काही ठिकाणी अर्ज भरण्यासाठी वेबसाईट हँग होत होती, तर काही ठिकाणी वीज नसल्याने पीकविमा भरायला अडचण येत असल्याने, अनेक शेतकरी यापासून वंचित राहिले होते. त्यामुळे आमदार पवार यांनी अधिवेशन काळात उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना विनंती करून पीकविमा भरण्याची मुदत वाढवून घेतली.

जिल्ह्यात 6 लाख 77 हजार 553 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना संरक्षण मिळाले आहे. कर्जत तालुक्यातील एकूण 60 हजार 79 हेक्टर, तर जामखेड तालुक्यातील 50 हजार 120 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना संरक्षण मिळाले आहे. नगर जिल्ह्यात खरिपाचे सरासरी 5 लाख 79 हजार 768 हेक्टर क्षेत्र असून, यंदा 5 लाख 80 हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. सततचा पाऊस, अतिवृष्टी, गारपीट व अन्य कारणाने शेतपिकांचे नुकसान झाले, तर भरपाई मिळावी यासाठी पंतप्रधान पीकविमा योजना राबविली जाते. यंदा राज्य शासनाने विमा हप्त्याचा भार उचलत शेतकर्‍यांना एक रुपयात विमा उतरविण्याची संधी उपलब्ध दिली. पीक विमा अर्ज भरताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी आमदार पवार यांनी सोय उपलब्ध केली.

सरकारी योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम राबविला. यंदा पाऊस कमी असल्याने दुष्काळ पडण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत पीक विम्याचा शेतकर्‍यांना फायदा होऊ शकतो.
                                                             – आमदार रोहित पवार 

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news