पुणे : एसटीची पहिली स्लीपर बस बनली दापोडीत!

पुणे : एसटीची पहिली स्लीपर बस बनली दापोडीत!
Published on
Updated on
पुणे : एसटीच्या स्लीपर बसनेसुध्दा प्रवाशांना आरामात झोपून प्रवास करता येणार आहे. कारण, एसटीच्या दापोडी कार्यशाळेत पहिली 2 बाय 1 स्लीपर बस तयार करण्यात आली आहे. आणखी 50 स्लीपर (शयनयान) बस तयार होत आहेत. लवकरच या बस प्रवाशांच्या सेवेत येतील. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने आता कात टाकली असून, ताफ्यात आता सर्व नव्या बस घेण्यास सुरुवात केली आहे. नुकत्याच एसटीच्या ताफ्यात नव्या लालपरी, हिरकणी, इलेक्ट्रिक शिवाई, इलेक्ट्रिक शिवनेरी बस दाखल झाल्या आहेत. त्यासोबतच आता ही नवी स्लीपर बसदेखील दाखल होत आहे.

प्रवाशांना आरामदायी सुविधा

बाहेरील उजेडाचा त्रास होऊ नये, म्हणून प्रवासी खिडक्यांना आकर्षक रंगाचे पडदे बसविण्यात आलेले आहेत. प्रवाशांना झोपण्यासाठी गादी आणि उशी एकत्र असलेली सुविधा देण्यात आली असून, आकर्षक रंगाचे रेक्झीन कापड वापरलेले आहे. प्रत्येक बर्थमध्ये मोबाईल चार्जिंगसाठी सुविधा दिलेली असून, मोबाईल ठेवण्यासाठी पाऊच दिला आहे. तसेच, मॅगझीन पाऊच व पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी ब—ॅकेटची सुविधा दिलेली आहे. पर्स अडकविण्यासाठी हूक दिले आहे. प्रत्येक बर्थमध्ये वाचनासाठी रिडिंग लॅम्प व निळ्या रंगाचा नाईट लॅम्प या दोनही सुविधा एकत्र असलेले एलईडी लाइट बसविलेले आहेत. वरच्या बर्थवर चढण्यासाठी मजबूत बांधणीची शिडी व धरण्यासाठी हँडलची व्यवस्था केली आहे.

अशी आहे स्लीपर बस

ही बस आकर्षक रंगसंगतीने रंगविण्यात आली आहे.
चालक केबिनमध्ये अनाऊसिंग सिस्टीम बसविली आहे.
पाठीमागील बाजूस एक रिव्हसिंग कॅमेरा बसविलेला असून, त्याची एलईडी स्क्रीन चालक कक्षात देण्यात आलेली आहे.
दिव्यांग व्यक्तींसाठी एक क्रमांकाचे शयनकक्ष आरक्षित असून, त्या कक्षात दिव्यांग प्रवाशाच्या सुविधेसाठी बेल देण्यात आली आहे.
गाडीच्या डाव्या बाजूस प्रवाशांचे सामान ठेवण्यासाठी सामानकक्ष तयार केलेले आहेत.

अंतर्गत आसन रचना

बसमध्ये 2 बाय 1 रचनेसह प्रवासी शयनकक्ष बांधण्यात आलेले आहेत. चालक बाजूस दुहेरी व वाहक बाजूस एकेरी अशा 5 ओळीत शयन रचना करण्यात आलेली असून, एकूण 30 प्रवासी आरामशीर झोपून प्रवास करू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. खालच्या व वरच्या प्रत्येक बर्थसाठी पुढे भागे सरकती काच असलेली स्वतंत्र खिडकी देण्यात आलेली आहे.

बसचा आकार

नवी स्लीपर बस 12 मीटर लांबीच्या टाटा चासिसवर बांधण्यात आलेली असून, बसची रुंदी 2.6 मीटर व उंची 3.6 मीटर आहे. गाडीला हवेचा अवरोध कमी होण्यासाठी एरोडायनेमिक आकार देण्यात आलेला असून, पुढील व मागील शो आकर्षक एफआरपीमध्ये तयार केलेला आहे.

सुरक्षा स्थिती

आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रवाशांना सावध करण्यासाठी बल्कहेड पार्टीशनवर इंटरकदॅम बसविण्यात आलेला असून, त्याचे बटण चालक कक्षात देण्यात आलेले आहे. चालकासमोरील बाजूस डोळ्यावर ऊन येऊ नये, यासाठी पडदा बसविण्यात आला आहे. आपत्कालीन सुटकेसाठी गाडीच्या मागील बाजूस गँगवेच्या रेषेमध्ये आपत्कालीन दरवाजा सुविधा दिली आहे. बसच्या वरील बाजूस दोन एस्केप हॅच देण्यात आलेले आहेत. तसेच, चालक कक्षामध्ये एक रूफ हॅच देण्यात आला आहे. आपत्कालीन काच फोडण्यासाठी गाडीमध्ये पुरेसे हातोडे योग्य ठिकाणी बसविलेले आहेत. गाडीला आग लागल्यास विझविण्यासाठी चार किलो व सहा किलोचे दोन अग्निशामक उपकरणे दिलेली आहेत व इंजिनसाठी एफ डी एस एस अग्निशामक यंत्रणा बसविण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news