जेऊर: पुढारी वृत्तसेवा
राहुरी मतदारसंघातील नगर तालुक्यातील कापूरवाडी व पोखर्डी येथील पाझर तलावांच्या दुरुस्तीसाठी जलसंधारण विभागाने 5 कोटी 40 लाख 53 हजार रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती राज्याचे नगरविकास ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
मंत्री तनपुरे म्हणाले की, नगर तालुक्यातील शेतकर्यांना वरदान ठरणार्या कापूरवाडी (गावठाण ) तलावासाठी 97 लाख 36 हजार रुपये, कापूरवाडी (मुंजाबा) 76 लाख 90 हजार रुपये, कापूरवाडी (कराळेमळा नं.1 ) 1 कोटी 16 लाख 33 हजार रुपये, पोखर्डी (वनजमिनीजवळील) 1 कोटी 27 लाख 48 हजार रुपये,पोखर्डी (गावठाण) 1 कोटी 22 लाख 46 हजार रुपये दुरुस्तीसाठी एकूण 5 कोटी 40 लाख 53 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
नगर तालुक्यातील तलावांचे दुरुस्तीचे कामे बर्याच वर्षांपासून झाली नव्हती. या तलावांची अवस्था अतिवृष्टीमुळे अतिशय बिकट झाल्याने पाणी गळतीचे प्रमाणही अधिक होते. पावसाळ्यातील पाणी साचून गळतीमुळे तलाव लवकर कोरडे पडत होते. मंत्री तनपुरे यांच्याकडे येथील लाभधारक शेतकर्यांनी तलाव दुरुस्तीची मागणी केली होती.
या मागणीची त्यांनी गंभीरतेने दखल घेऊन मंत्री तनपुरे यांनी शासन पातळीवर वेळोवेळी पाठपुरावा करून जलसंधारण विभागाने या तलाव दुरुस्तीसाठी निधी मंजूर केल्याने या परिसारातील शेतकर्यांचे क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे. जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. तसेच राहुरी-नगर-पाथर्डी मतदार संघातील उर्वरित पाझर तलावांची दुरुस्तीसाठी निधी मंजूर करणेसाठी पाठपुरावा सुरू असून, लवकरच या कामांना मंजुरी मिळण्यासाठी प्रयत्नशील आहे. या कामामुळे कापूरवाडी व पोखर्डी येथील लाभधारक शेतक-यांनी मंत्री तनपुरे यांना धन्यवाद देत समाधान व्यक्त केले आहे.