

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : शैक्षणिक गुणवत्ता, भौतिक सुविधा आणि विविध उपक्रमांमुळे इंग्रजी शाळांच्या तुलनेत झेडपीच्या शाळा सरस ठरताना दिसत आहेत. त्यामुळे आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी पालकांचा कल मराठी शाळेकडे असल्याचे दिसते. या वर्षी दाखलपात्र 35 हजार विद्यार्थ्यांपैकी तब्बल 28 हजार मुला-मुलींनी पहिलीला जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला आहे, तर केवळ 2500 मुले-मुली इंग्रजी शाळेत जाणार आहेत. दरम्यान, मराठी शाळेत पहिलीच्या विद्यार्थ्यांचे विविध उपक्रमांनी स्वागत केले जात आहे.
इयत्ता पहिलीची पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतल्याचे दिसले. पालकांच्या भेटीगाठी घेतानाच मराठी शाळांची वाढती गुणवत्ता पालकांच्या निदर्शनास आणून दिली. एकीकडे खासगी शाळांमधील अर्थकारण, त्यातून पालकांची होणारी परवड, तर दुसरीकडे मराठी शाळांनी सिद्ध केलेली गुणवत्ता, या संदर्भातील जनजागृतीनंतर पालकांचा कल पुन्हा एकदा मराठी शाळेकडे दिसत आहे.
या वर्षी जिल्ह्यातील 14 तालुक्यांतून 35182 मुले-मुली पहिलीच्या प्रवेशासाठी पात्र होते. शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या सूचनेनुसार सर्व मुख्याध्यापकांनी मराठी शाळेत जास्तीत प्रवेश करून घेतले आहे. त्यामुळे 15 जूनपर्यंत 30662 मुला-मुलींचे पहिलीत प्रवेश झाल्याचे पुढे आले आहे.
इयत्ता पहिलीसाठी 15904 मुलांनी आणि 14758 मुलींनी आपल्या शैक्षणिक वाटचालीचा श्रीगणेशा केला आहे. यातील 1506 मुले आणि 253 मुलींनी इंग्रजी शाळेत प्रवेश घेतला आहे.
जिल्ह्यात या वर्षी 35182 प्रवेशपात्र मुले-मुली आहेत. 15 जूनपर्यंत 30662 प्रवेश झाले आहेत. त्यामुळे उर्वरित पाच हजार विद्यार्थींचे प्रवेश नेमके कोठे झाले, याविषयी समजू शकलेले नाही.
पहिलीत झालेले प्रवेश
तालुका मुले मुली
अकोले 1494 1385
जामखेड 859 797
कर्जत 630 563
कोपरगाव 998 902
नगर 1294 1211
नेवासा 1785 1689
पारनेर 1034 991
राहाता 1386 1291
पाथर्डी 1138 1036
राहुरी 915 874
संगमनेर 1310 1170
शेवगाव 891 821
श्रीगोंदा 1290 1149
श्रीरामपूर 880 879
एकूण 15904 14758
हेही वाचा