

नगर : पुढारी वृत्तसेवा : शहरातील मंगल कार्यालय मालकांची बैठक कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी घेऊन, चोरीच्या घटना घडू नये, तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मंगल कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे आवाहन केले. त्यासोबतच लग्न समारंभात ध्वनिक्षेपकाचा वापर हा सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या आवाजाच्या मर्यादेतच करण्याच्या सूचना करण्यात आल्या. शहरातील 25 मंगल कार्यालय मालकांची या बैठकीला उपस्थिती होती.
लग्न असो किंवा इतर कोणताही कार्यक्रम मंगल कार्यालयातील गर्दीचा फायदा घेऊन चोरीचे प्रकार घडतात. अशा प्रकारांना आळा बसावा यासाठी मंगल कार्यालय परिसरामध्ये व विशेषतः प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आवाहन कोतवाली पोलिसांनी केले आहे. त्यासोबतच पार्किंगमधून मोटारसायकल चोरी जाण्याचे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडतात. त्यासाठी मंगल कार्यालयातील पार्किंगचा संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीत येईल, अशा पद्धतीने उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या. तसेच, रहदारीस कोणताही अडथळा होऊ नये यासाठी, वाहन पार्किंगचे ठिकाणी व परिसरामध्ये सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात यावी, असे पोलीस निरीक्षक यादव यांनी बैठकीत सांगितले.
मंगल कार्यालय मालकांनी काही अडचणी बोलून दाखविल्या. त्या सोडविण्यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे पोलिस निरीक्षक यादव यांनी सांगितले. बैठकीला अविनाश कोतकर, गणेश कराळे, उमेश कोतकर, अक्षय राहिंज, सुरेश खरपुडे, विशाल पटवेकर, अवधूत फुलसौंदर, युवराज शिंदे, रघुनाथ चौरे, भूषण गारुडकर आदी उपस्थित होते.
हे ही वाचा :