

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : लग्नानंतर माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावत शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने रेल्वेसमोर उडी घेऊन जीवन संपवल्याची घटना 2014 मध्ये श्रीगोंदा तालुक्यातील ढोकराई येथे घडली होती. हुंडाबळीच्या या गुन्ह्यात मृत विवाहितेचा पती व सासूला दहा वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी पाच हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला असून, या खटल्यात सरकार पक्षातर्फे अॅड. संगीता ढगे यांनी न्यायालयात बाजू मांडली.
राजकुमार रामदास भगत, सरूबाई ऊर्फ सरस्वती रामदास भगत (दोघे रा. ढोकराई, ता. श्रीगोंदा, जि.अहमदनगर) अशी शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. मयत सुदेशना हिचे लग्न आरोपी राजकुमार भगत याच्याशी 2010 मध्ये झाले होते. सुदेशना हिच्या घरच्यांनी लग्नात सात तोळे सोने, 21 हजार रुपये व संसारोपयोगी वस्तू दिल्या होत्या. लग्नानंतर सुदेशनाचा पती राजकुमार भगत, सासरा रामदास भगत, सासू सरस्वती भगत, ननंद स्वाती यांनी सुरुवातीला काही दिवस चांगले नांदविले व नंतर माहेरहून पैसे आणण्यासाठी छळ सुरू केला. विवाहिता सहा महिन्यांची गरोदर असताना सासरच्यांनी दमदाटी व लाथाबुक्यांनी मारहाण केली होती.
तसेच विषारी औषध पाजले होते. यात विवाहितेचा गर्भपात झाला होता. त्यानंतर आरोपींनी विवाहितेला सांगितले होते, की नांदायचे असेल तर शेतात घर बांधण्यासाठी व पोल्ट्रीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून घरातून हाकलून दिले होते. 2014 मध्ये विवाहितेला एक मुलगी झाल्यानंतर ती सासरी नांदायला गेली. परंतु, सासरच्या मंडळीनी विवाहितेला माहेरहून पैसे आणण्यासाठी छळ सुरूच ठेवला.
सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने श्रीगोंदा रेल्वे रुळावर रेल्वेसमोर उडी घेऊन जीवन संपवलं होत. या घटनेनंतर विवाहितेचा भाऊ प्रवीण मोहनलाल मांडे यांनी लोहमार्ग पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता. पोलिस उपनिरीक्षक मोरे यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षाच्या वतीने 9 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. न्यायालयासमोर आलेला साक्षी पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. खटल्यात फिर्यादीच्या वतीने अॅड. संग्राम देशमुख यांनी सहकार्य केले.
हेही वाचा