अहमदनगर : राष्ट्रवादीत माझी घुसमट सुरू होती! घनश्याम शेलार

अहमदनगर : राष्ट्रवादीत माझी घुसमट सुरू होती! घनश्याम शेलार

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीत मला मिळालेली मते ही सर्वसामान्य जनतेची होती; मात्र जे माझ्यासोबत होते, त्यांनी काय काय केले, याचा अहवाल वरिष्ठांना दिला होता. जिल्हा बँकेच्या चेअरमन निवडीतही काय झाले, हे सर्वांनी पाहिले आहे. मात्र पक्षाला प्रामाणिक कार्यकर्त्यांची कदर नाही आणि बेइमानांना शिक्षा नाही, त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याची राष्ट्रवादीत घुसमट सुरू होती. आता भारत राष्ट्र समितीच्या माध्यमातून शेतकरी हिताचा एक नवा किरण दिसल्याने मी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन 'बीआरएस'मध्ये प्रवेश केला, अशी भूमिका ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत मांडली.

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा शरद पवार यांचे विश्वासू समजले जाणारे घनश्याम शेलार यांनी तेलंगणाच्या बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. शेलार यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद भुषविलेले आहे. शिवाय गेल्या निवडणुकीत श्रीगोंदा मतदारसंघातून ते राष्ट्रवादीचे उमेदवार होते. दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली.
शेलार म्हणाले, मी राष्ट्रवादीत 23 वर्षे काम केले. त्यामुळे पक्षाचे नेते शरद पवार यांच्याबाबत कोणतीही तक्रार नाही.

मात्र खाली काम करणारे लोक पक्षाची विचारधारा जपत नव्हते. या पक्षात राहून दुसर्‍या पक्षाच्या नेतृत्वाशी संबंध ठेवतात. शेतकर्‍यांच्या उसाची देणी न देता पक्षाच्या पहिल्या रांगेत येऊन बसतात. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे हे मला शक्य नाही. मी पहिल्यापासूनच शेतकरी हितासाठी लढलो. भारत राष्ट्र समितीचे तेलंगणातील शेतकरीहिताचे काम मी पाहिले आहे.

मुख्यमंत्री के. सी. राव यांनी शेतकर्‍यांना 24 तास मोफत वीज, पेरणीसाठी अनुदान, हमीभावाने खरेदी, बियाणे, खतांची कमी दरात विक्री इत्यादी मोठे निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळे हाच तेलंगणा पॅटर्न महाराष्ट्रात राबविल्यास येथील शेतकरी सुखी, समृद्ध, आनंदी होणार आहे. त्यामुळे आपण या पक्षासोबत राहून शेतकरी हिताचे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. येणार्‍या काळात पक्ष देईल ती जबाबदारी आपण स्वीकारू, असेही शेलार यांनी सांगितले. या वेळी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून लढणार की श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात, या प्रश्नावर मात्र शेलार यांनी मौन बाळगले.

तेलंगणा खरेदी करणार नगरचा कांदा

के. सी. राव यांच्या नेतृत्वातील तेलंगणा राज्य नगरचाच नव्हे तर महाराष्ट्रातील कांदा खरेदी करणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना नक्कीच दिलासा मिळेल, असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news