शेवगाव : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील 12 ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगूल वाजला असून, त्या भागात आचारसहिंता लागू करण्यात आली आहे. 20 डिसेंबर रोजी या ग्रामपंचायतीवर नवीन राज येणार आहे. राज्यात ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणार्या सुमारे 7 हजार 751 व जिल्ह्यातील 203 ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगूल वाजला आहे. शेवगाव तालुक्यात 1 जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 कालावधीत मुदत संपणार्या 13 ग्रामपंचायती आहेत. पैकी विजयपूर ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया पार पडली असून, ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणार्या 12 ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत व मतदार याद्यांचा कार्यक्रम झाला आहे .हा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची इच्छुकांना आस लागली होती .
आता तालुक्यातील अमरापूर, दहिगाव-ने, भायगाव, जोहरापूर, खामगाव, खानापूर, प्रभूवाडगाव, रांजणी, सुलतानपूर खुर्द, वाघोली, आखेगाव, कुरुडगाव, रावतळे ग्रामपंचायतीचा सदस्यपदांसह थेट सरपंचाच्या सार्वत्रीक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. शुक्रवार दि.28 रोजी तहसीलदारांनी नोटीस प्रसिद्ध करणे, सोमवार दि. 28 नोव्हेंबर ते शुक्रवार, दि.2 डिसेंबर पर्यंत नामनिर्देशन अर्ज दाखल करणे, सोमवार दि.5 डिसेंबर छाननी, बुधवार दि. 7 डिसेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम वेळ व याच दिवशी निवडणुक चिन्ह तर रविवार दि.18 डिसेंबरला आवश्यक असल्यास मतदान घेऊन, मंगळवार, दि. 20 डिसेंबरला मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे. निवडणुका जाहीर होताच गावांतील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.