अहमदनगर : तोतया पोलिस अधिकार्‍यास अटक

अहमदनगर : तोतया पोलिस अधिकार्‍यास अटक

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : तोतया पोलिस अधिकारी बनूून लोकांची फसवणूक करणार्‍या एका भामट्याला नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाईपलाईन रोडवरील सिटी लॉन्स येथे पकडले आहे. सतीश काशिनाथ झोजे (वय 29, हल्ली रा. ढवणवस्ती, तपोवनरोड, नगर, मूळ रा. मालुंजा ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर) असे या भामट्याचे नाव आहे. हा भामटा पोलिस अधिकारी असल्याचे सांगून लोकांची फसवणूक करतो. तो सध्या कारमध्ये सिटी लॉन्स, पाईपलाईन रोड येथे उभा असून गाडीमध्ये डॅश बोर्डवर पोलिस ऑफिसर कॅप ठेवलेली आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली. त्यांनी तेथे पथक कारवाईसाठी पाठविले.

या पथकाने तात्काळ तेथे जाऊन त्यास नाव विचारले. त्याने पोलिस उपनिरीक्षक सतीष काशिनाथ झोजे (नेमणूक पोलीस मुख्यालय, अहमदनगर) असे सांगितले. पथकाने त्यास ओळखपत्र दाखविण्यास सांगितले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे या पथकाने त्याचे नावाचा कोणी पोलिस अधिकारी मुख्यालय येथे नेमणुकीस आहे का, याबाबत माहिती घेतली असता असा कोणीही पोलिस अधिकारी नेमणुकीस नसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे हा तोतया पोलिस अधिकारी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पथकाने त्याच्या कडे कसून चौकशी केल्यावर त्याने त्याचे खरे नाव सांगितले.

त्याची झडती घेतली असता त्यात सतीष काशिनाथ झोजे परि. पोलिस उपनिरीक्षक या नावाची नेमप्लेट लावलेला ड्रेस, टोपी त्यावर राजमुद्रा असलेला मोनोग्राम, बेल्ट, बूट, लाईनयार्ड, असा पोलीस उपनिरीक्षकाचा संपूर्ण गणवेश आढळून आला. त्याच्या त्याची कार ताब्यात घेऊन तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news