पक्ष दुभंगला तरी नाती कायम! राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या आमदारांची समंजस भूमिका | पुढारी

पक्ष दुभंगला तरी नाती कायम! राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या आमदारांची समंजस भूमिका

मुंबई : दिलीप सपाटे : पावसाळी अधिवेशनापूर्वी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट बाहेर पडल्याने अधिवेशनात राष्ट्रवादीचे दोन गट एकमेकांना भिडतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, दोन आठवड्यांच्या कामकाजात दोन्ही गट शांतच आहेत, त्यामुळे पक्ष दुभंगला तरी नाती कायम असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

सभागृह आणि सभागृहाबाहेर जणू काही घडलेच नाही, असेच दोन्ही गटातील आमदार एकमेकांशी वागत आहेत. त्यातच जयंत पाटील आणि सुनील तटकरे या दोन्ही गटाच्या प्रदे- शाध्यक्षांनी एकमेकांना अशी काही मिठी मारली की, राष्ट्रवादीत खरचं दोन गट पडलेत की सारे नाटक आहे? अशीही चर्चा सुरू झाली. शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडून एक वर्ष होऊन गेले तरी या दोन्ही गटात संघर्ष सुरूच आहे. अद्याप एकमेकांना आव्हाने आणि प्रतिआव्हाने देणे सुरूच आहे. पक्ष फुटीनंतर निर्माण झालेला कडवटपणा जराही कमी झालेला नाही. अजूनही शिंदे गटावर गद्दार आणि खोक्यांची टीका उद्धव ठाकरेंनी सोडलेली नाही. पण, राष्ट्रवादी काँग्रेस त्याला अपवाद ठरली आहे.

सभागृहात शरद पवारांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नवे प्रतोद जितेंद्र आव्हाड हे अजित पवारांच्या गटावर तुटून पडतील, असे वाटत होते. मात्र, शरद पवार गटाचे आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना त्यांच्या दालनात भेटत होते. तर अजित पवारांच्या गटाचे आमदारही येता जाता जयंत पाटील यांची आवर्जून भेट घेत होते.

‘त्या’ मिठीची चर्चा; शिंदे गटाला हेवा!

दुसऱ्या आठवड्यात जयंत पाटील आणि सुनील तटकरे या दोघांनी तर कमालच केली आणि सर्वांना तोंडात बोट घालायला लावली. जयंत पाटील यांनी विधानभवन परिसरात सुनील तटकरे यांना थेट मिठीच मारली. त्याला तटकरे यांनीही तसाच प्रतिसाद देत आलिंगन दिले. ही मिठी पाहून राष्ट्रवादीच्या फुटीर आमदारांना हायसे वाटले, त्याचवेळी पवार शरद गटाच्या आमदारांची संभ्रमावस्था वाढली. तर शिंदे गटाच्या आमदारांना या मीठीचा हेवा वाटला नसला तर नवलच.

Back to top button