

अकोले : पुढारी वृत्तसेवा : भाजपचा मुंबईतील नगरसेवक असल्याचे सांगत कल्याण-भिंवडी फाट्यावरील डान्सबार चालकांकडून खंडणी उकळल्याच्या आरोपावरून अकोल्यातील भाजपचा नगरसेवक हितेश रामकृष्ण कुंभार याच्यासह तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. कुंभार यांनी 8 लाखांची खंडणी आणि प्रतिमहिना 25 हजार रुपयांची मागणी करून 27 हजार रुपये स्वीकारल्याचे पोलिसांनी सांगितले. कल्याण-भिवंडी फाट्यावर असलेल्या लैला बारचे चालक संतोष बबन भोईर (वय 53) यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादीचा आशय असा ः लैला बार मित्र हरीश हेगडे व मी चालवतो. गेल्या चार ते पाच दिवसांपासून हितेश कुंभार बारवर येऊन सागे, की 'मी मुंबईचा भाजपचा नगरसेवक आहे.
संबंधित बातम्या :
तुमचे बार चालवायचे असतील तर मला ऑर्केष्ट्रा बारचे 5 लाख रुपये व सर्विस बारचे 3 लाख रुपये द्यावे लागतील आणि दरमहा 25 हजार द्यावे लागतील. त्यावर मी सांगितले, की इथे देवदास बार, किंग्स बार, किनारा बार, सिरोज बार, पारो बार, सिंगर बार, स्वागत बार, लवली बार या बारचालकांशी बोलून कळवतो. त्यानंतर दोन दिवसांनी रात्रीच्या सुमारास हितेश कुंभार दोन साथीदारांसह आला आणि म्हणाला, की बार चालवायचा असेल तर तुम्हाला मी सांगितले तेवढे पैसे गुडलक म्हणून द्यावे लागतील. त्या वेळी मी त्यास म्हणालो, की उद्या रात्री सर्वांशी चर्चा करून गुडलक म्हणून रक्कम देतो.
मी इतर बारचालकांकडून प्रत्येकी 3 हजार रुपयांप्रमाणे रक्कम घेऊन 27 हजार रुपये जमा केले. मी लैला बारच्या काउन्टरवर हजर असताना हितेश कुंभार व त्याचे दोन साथीदार आले व रक्कम मागितली. मी सांगितले, की माझी सर्वांशी चर्चा झाली आहे. ते येत आहेत. आपण पुन्हा मिटिंगकरिता बसू. ते तिघे बारच्या टेबलवर बसले. सर्व बारचे चालक व माझा मित्र गुलाम शेख असे सर्व जण बारमध्ये आले असता आम्ही चर्चेला बसलो. आम्ही म्हणालो, की वन टाईम रक्कम जास्त होते. आम्हाला थोडा वेळ द्या. तुम्हाला आम्ही गुडलक म्हणून काही रक्कम देतो. त्यानंतर चर्चेमधून बाहेर येऊन कोनगाव पोलिस स्टेशनला जाऊन पोलिसांना माहिती दिली.
नंतर लैला बार येथे दुपारच्या सुमारास हितेश रामकृष्ण कुंभार (वय 33) व राकेश सदाशिव कुंभकर्ण (वय 39, दोघे रा. अकोले) आणि देवेंद्र चंद्रकांत खुंटेकर (वय 27, रा. मुंबई) यांना 500 रुपयांच्या 54 नोटा असे 27 हजार रुपये दिले. आजचे पैसे झाले. मी ठरलेली वन टाईम रक्कम घेण्यास परत येईल, असे हितेश कुंभार निघाले. त्याच वेळी पोलिसांनी तेथे येऊन अंगझडती घेऊन तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे रक्कम सापडल्यानंतर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.