

समीर बेग
राहाता(अहमदनगर) : राहाता येथील नगर पालिकेच्या वाहनामध्ये भरण्यात येणार्या डिझेलमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचे माहिती अधिकारात मागितलेल्या माहितीमधून समोर आला आहे. सदर गैरव्यवहार करणार्या अधिकार्यांची चौकशीची मागणी आता होत आहे. राहाता नगर पालिकेत पाणी प ुरवठा करण्यासाठी ट्रॅक्टरचा उपायोग करण्यात येत आहे. या ट्रॅक्टरमध्ये असलेल्या डिझेल टाकीच्या क्षमतेपेक्षा जास्त डिझेल भरण्यात आल्याचे समोर आलेले आहे.
सदरचा प्रकार एकदा नव्हेतर वारंवार झाल्याचे दिसत आहे. माहिती अधिकारात 6 फेब्रु 2023 रोजी राहाता नगर पालिकेच्या ताब्यात असलेली वाहनांचे डिझेल बाबतचे विभागानुसार लॉगबुकची माहिती मागवली असता पाणी पुरवठा विभागाच्या वाहन लॉग बुकमध्ये झालेला डिझेलचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे.
सदरची माहिती मिळाल्यावर निरीक्षण- परीक्षण केले असता नगर पालिकेमध्ये पाणी टँकरसाठी फर्ग्युसन कंपनीचा ट्रॅक्टर आहे. ज्याची डिझेल इंधन टाकीची क्षमता ही कंपनीने 47 लिटरची दिली आहे. परंतु या ट्रॅक्टर मध्ये 55, 65, 70 लिटर पर्यंत डिझेल टाकण्यात आले. हा सर्व गैरव्यवहार सन 2021 -2022 या आर्थिक वर्षात घडला.
या आर्थिक वर्षात पाणी पुरवठा विभागास असलेले अधिकारी, कर्मचारी यांच्या संगनमताने हा प्रकार झालेला आहे. या सर्व घोटाळ्याची माहिती तत्कालीन मुख्याधिकारी तसेच प्रशासक तुषार आहेर यांना लेखी तक्रारीद्वारे देवून सदरील तक्रारीवर काय कार्यवाही झाली याची विचारणा केली असता ते संबंधीत अधिकार्यांना पाठीशी घालताना दिसून येत आहे.
याबाबत सर्व माहिती नगर पालिकेत उपलब्ध असूनही तुषार आहेर का कारवाई करण्याऐवजी उडवा उडवीचे उत्तर देत आहेत ? हा मोठा गंभीर प्रश्न आहे. हा सर्व प्रकार नगर पालिकेच्या संबंधित काही अधिकारी, कर्मचारी यांच्या संगनमताने सुरु आहे का ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधित दोषी अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कडक कारवाही होईल का? की वरिष्ठ अधिकारीही या अधिकार्यांना पाठीशी घालणार? असे एकना अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.
हेही वाचा