

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर इमामपूर शिवारात रविवारी (दि. 18) उभ्या कंटेनरला भरधाव कंटेनरची धडक बसून चालक जागीच ठार झाला. अपघातानंतर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. इमामपूर शिवारात भैरवनाथ मळा येथे रविवारी सकाळी सहा वाजता हा अपघात झाला. रस्त्यावर नादुरुस्त उभ्या असलेल्या कंटेनरला (एमएच 40 सीडी 4460) नगरकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणार्या कंटेनरने (एमएच 05 एएम 7818) पाठीमागून जोराची धडक दिली.
त्यात या कंटेनरच्या केबिन पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने चालक संतोष किसन पिसाळ (वय 45, रा. चोराडे, म्हासुरणे, जि. सातारा) केबिनमध्ये अडकला. इमामपूरचे सरपंच भीमराज मोकाटे, अनिकेत आवारे, सुजय आवारे, वैभव मोकाटे, मच्छिंद्र आवारे, छोटू आवारे, बंटी आवारे, ऋषिकेश आवारे, सुभाष आवारे, बाबासाहेब मोकाटे यांनी जखमी चालकास बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
अपघातानंतर दोन्ही कंटेनर रस्त्याच्या दोन्ही बाजूना आडवे झाल्याने संपूर्ण वाहतूक खोळंबली होती. रस्त्याच्या दुतर्फा सुमारे दोन ते तीन किलोमीटर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. एमआयडीसी पोलिसांनी क्रेनच्या साह्याने दोन्ही कंटेनर बाजूला केल्यानंतर सुमारे दोन तासांनी वाहतूक सुरळीत झाली. छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अनेक ठिकाणी लहान मोठे खड्डे पडलेले आहेत. तसेच सूचनादर्शक फलक, अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येत नसल्याने अपघातांची संख्या वाढत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. वारंवार मागणी करून देखील रस्तादुरुस्ती तसेच सिग्नल व अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
महामार्गावर नादुरुस्त झालेली वाहने रस्त्यावर उभी असतात. त्यामुळे अपघात वाढत आहेत. तरी नादुरुस्त वाहने तत्काळ रस्त्याच्या बाजूला काढणे आवश्यक आहे. तसेच रस्तादुरुस्ती व सूचनाफलक, सिग्नल बसविणे गरजेचे आहे.
– भीमराज मोकाटे,
सरपंच, इमामपूर
हेही वाचा