

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : मारहाणीच्या गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यासाठी मदत करण्याच्या बदल्यात चार हजारांची लाच घेताना बेलवंडी पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. ज्ञानेश्वर रावसाहेब पठारे (बेलवंडी पोलिस ठाणे, ता.श्रीगोंदा) असे लाचखोर हवालदाराचे नाव आहे.
नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ज्ञानेश्वर पठारे याने लाचेची मागणी केल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर बुधवारी (दि.21) ही कारवाई करण्यात आली. तक्रारदार यांच्यावर बेलवंडी पोलिस ठाण्यात मारहाणीचा 1 जून रोजी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यासाठी मदत केली म्हणून, हवालदार पठारे याने दहा हजारांची मागणी केली होती.
नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावला असता पठारे याने तंडजोडी अंती चार हजार रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले. बेलवंडी पोलिस ठाण्याच्या आवारातच पठारे याला चार हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गहिनीनाथ गमे, कराड, राधा खेमनर यांनी ही कारवाई केली.
हेही वाचा