नगर : पुढारी वृत्तसेवा : नीलेश लंके प्रतिष्ठान आयोजित शिवपूत्र संभाजी महानाट्यांची सांगता नगरमध्ये झाली. सांगता दिनी शरद पवार गटाचे खा. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीचे आ. नीलेश लंके यांना लोकसभेसाठी खुली ऑफर दिली. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात स्वाभीमानाची 'तुतारी' वाजवा अशी साद कोल्हेंनी घातली. आता आ. लंके त्याला काय प्रतिसाद देतात? याकडे नगरकरांसह राज्याचे लक्ष लागून आहे. लंके प्रतिष्ठानने आ. नीलेश लंके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत 'शिवपूत्र संभाजी' महानाट्य आयोजीत केले होते. खा. कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेल्या नाटकाच्या सांगतेला कोल्हे यांनी आ. लंके यांना ही ऑफर दिली. वाढदिवसाचे गिफ्ट द्यायचे असते, पण मी मागतोय.
महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, दिल्ली तख्खाला घाम फोडणारा, आमच्या खांद्याला खांदा लावणारा खासदार संसदेत पाठवा, असे आवाहन करतानाच लोकनेते नीलेश लंके यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी नगर दक्षिणमध्ये वाजावी अशी प्रार्थना खा. कोल्हे यांनी आई जगदंबाकडे करत असल्याचे ते म्हणाले. आ. नीलेश लंके यांच्या सामाजिक कार्याचे खा. कोल्हे यांनी कौतूक केले. कुठलीही राजकिय पार्श्वभूमी नसताना सर्वसामान्य कुटूंबातील माणसं जनतेच्या काळजावर अधिराज्य गाजवतात त्याचा अभिमान असल्याचे कोल्हे म्हणाले. महानाटयास उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल नगरकरांप्रती कोल्हे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
महानाटयाच्या शेवटच्या दिवशी आ. नीलेश लंके यांनीही छत्रपती संभाजींसोबत सरदाराची भूमिका साकारली. सरदाराचा पोषाख परिधान केलेल्या आ. लंके यांच्या हातात तलवार दिसताच उपस्थितांनी जल्लोष केला.
हाही वाचा