

अकोले; पुढारी वृत्तसेवा : अकोले तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यामधील सोमलवाडी व शिळवंडी या दोन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीची निवडणूक बिनविरोध झाली. ९ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी २५ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. रविवारी (दि, १८) झालेल्या मतदान प्रक्रियेत सरासरी ८० टक्के मतदान झाले. याची मतमोजणी मंगळवारी (दि, २०) पार पडणार आहे. यामुळे लोकनियुक्त सरपंच पदाच्या निवडीकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
अकोल्यातील आंभोळ, भंडारदरा, चास, डोंगरगाव, गुहिरे, लहित बुद्रुक, शेंडी, वाकी, मुरशेत या ९ ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी ११ पदासाठी ४७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. परंतु २२ उमेदवारांनी सरपंच पदासाठी माघार घेतली. तसेच ग्रामपंचायत सदस्य पदासाठी १९३ पैकी ९२ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर १०१ उमेदवार ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीच्या रिगणात उभे होते. सरपंच पदासाठी सोमलवाडी व शिळवंडी या २ ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. त्याचबरोबर ४१ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध झाले आहेत.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे यांच्या शेंडी ग्रामपंचायत आणि गुहिरे ग्रामपंचायतील सदस्य पदाच्या सर्व जागा बिनविरोध झाल्या, मात्र सरपंच पदासाठी निवडणूक झाली. तर ग्रा.पं.सदस्य उमेदवार १०१ निवडणूक रिंगणात उतरले होते. तसेच ९ ग्रामपंचायतीसाठी २५ उमेदवार संरपच पदासाठी निवडणूक रिंगणात आपले नशिब आजमावत आहेत. परंतु अकोले तालुक्यातील भाजपचे माजी मंत्री मधुकर पिचड आणि माजी आमदार वैभव पिचड, राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत निवडणूकीत संरपच व सदस्य पदासाठी अनेकांनी उमेदवारी करत निवडणूक लढवली आहे.
आज पार पडलेल्या मतदान प्रक्रियेमध्ये ९ ग्रामपंचायतीमध्ये २८ केंद्र असुन सरासरी ८० टक्के मतदान झाले आहे. अकोल्याचे तहसीलदार सतीश थेटे, नायब तहसीलदार ठकाजी महाले यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. एकूण २८ मतदान केंद्रांवर १४० महसूल कर्मचारी तसेच अकोले पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, राजुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ५६ पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त बजविला आहे.
हेही वाचा