चंद्रशेखर घुले-अजित पवार भेटीने कार्यकर्ते बुचकळ्यात

चंद्रशेखर घुले-अजित पवार भेटीने कार्यकर्ते बुचकळ्यात
Published on: 
Updated on: 

शेवगाव तालुका :

पुढारी वृत्तसेवा : शरद पवारांचे खंदे समर्थक अन् जयंत पाटील यांचे सख्खे सोयरे असलेले माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने नेवासा-शेवगावातील कार्यकर्तेही बुचकळ्यात पडले आहेत. घुले हे बुधवारी शरद पवार अन् गुरुवारी अजित पवारांच्या भेटीला पोेहचल्याने त्यांची भूमिका नेमकी काय? असा प्रश्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.

नेवासा-शेवगाव तालुक्यातील राष्ट्रवादीवर घुले बंधूचे एकहाती वर्चस्व आहे. घुले घेतील तो निर्णय दोन्ही तालुक्यातील पदाधिकारी घेतील असे बोलले जाते. अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेत भाजप-शिंदे सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. बुधवारी मुंबईत शरद पवार व अजित पवार यांच्या गटाचे स्वतंत्र मेळावे झाले. घुले कोणाच्या मेळाव्याला जाणार? याची उत्सुकता होती. शरद पवारांसोबत सावलीसारखे उभे असलेले जयंत पाटील हे घुले यांचे सख्खे मेहुणे असल्याने ते शरद पवारांसोबत असतील, अशी अटकळ बांधली जात असतानाच चंद्रशेखर घुले हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला पोहचले. दोघांत बराच वेळ चर्चा झाली. या चर्चेचा तपशील समजू शकला नाही, मात्र कोणता झेंडा हाती घ्यायचा? असा पेच घुलेंसमोर निर्माण झाल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगत आहेत.

शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून 2019 ची विधानसभा निवडणूक चंद्रशेखर घुले यांनी लढविली, मात्र त्यांचा पराभव झाला. घुलेंच्या वर्चस्वाखालील ज्ञानेश्वर साखर कारखाना नेवासा तालुक्यात असल्याने दोन्ही तालुक्यांवर त्यांचे प्राबल्य आहे. नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख हे घुलेंचे व्याही. गडाख हे उद्धव ठाकरे सेनेसोबत आहेत. त्यामुळे घुले नेवाशात गडाखविरोधी भूमिका घेणार नाहीत, अशी चर्चा असली तरी राजकारणात कधी काय होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळेच घुले बंधूंच्या भूमिकेकडे नेवासा-शेवगावसह जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

घुले म्हणाले… सांगतो!
राष्ट्रवादी स्थापनेपासून स्व. मारुतराव घुले पाटील यांनी शरद पवारांची साथ दिली. चंद्रशेखर व नरेंद्र घुले दोघांनाही शरद पवारांनी आमदारकीची संधी दिली. दोघेही राष्ट्रवादीचे माजी आमदार आहेत. राजश्री चंद्रशेखर घुले यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पदही दिले. नरेंद्र घुले यांचा मुलगा क्षितिज यांनी शेवगाव पंचायत समितीचे सभापती पदाची धुरा सांभाळली. नुकत्याच झालेल्या जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत चंद्रशेखर यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली, मात्र दगाफटका होऊन त्यांचा पराभव झाला. इतकी पदे देणार्‍या घुले बंधूंना कोणाच्या राष्ट्रवादीकडे जायचे? असा प्रश्न पडल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. शरद पवारांसोबत की अजित पवारांसोबत असा थेट प्रश्न केला असता घुले यांनी 'सांगतो' इतकेच त्रोटक उत्तर देत अधिक भाष्य करणे टाळले.

हे ही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news