कोपरगाव : ‘तो’ फुलवितो वाचनातून चैतन्य..!

कोपरगाव : ‘तो’ फुलवितो वाचनातून चैतन्य..!
Published on
Updated on

महेश जोशी

कोपरगाव(अहमदनगर) : घरची अत्यंत गरीबी, परंतु ज्ञानाची श्रीमंती बाळगणारा, वयाच्या 9 व्या वर्षापासूनच वाचनाच्या जबरदस्त छंदातून समृद्धीचे चैतन्य फुलविणारा चैतन्य दीपक वाघ हा विद्यार्थी चर्चेचा विषय ठरला आहे. शहरात छत्रपती संभाजी महाराज सर्कलजवळ वरद विनायक मंदिराजवळ राहणारा, साईबाबा चौफुलीजवळ कर्मवीर भाऊराव पा. विद्यालयात इ. 9 वीत शिकणारा चैतन्य केंद्रीय व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवायचे, माय- पित्याचे स्वप्न पूर्ण करायचे, हे ध्येय बाळगून अभ्यासात दंग असतो.

सध्या मुलांची पिढी मोबाईलच्या व्यसनात दंग असते, मात्र चैतन्य त्याला अपवाद आहे. इ. 4 थीपासुन विचारवंत, ज्ञानी लेखकांची तो पुस्तके वाचतो. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील पुस्तक वाचणे हे त्याचे आत्मिक समाधान आहे. साने गुरुजी यांचे आदर्श, शिक्षण हे वाघाणीचे दूध आहे आणि ते घेणारा गुरगुरलाचं पाहिजे, संदेश त्याने खरा करून दाखविला. वडील गोदावरी खोरे दूध संघात नोकरी करतात. आई ज्योती गृहिणी असून सराफाच्या दुकानात काम करून कुटुंबाचा गाडा हाकतात.

चैतन्यला कुणी खाऊसाठी पैसे दिले तर त्यातून तो थोर विचारवंतांची पुस्तके घेण्याचा हट्ट धरतो. कोपरगाव नगरपालिकेच्या डॉ. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर वाचनालय व ग्रंथालयातून त्याने आत्तापर्यंत बरीच पुस्तके आणून वाचली. त्याची स्वतंत्र टीपणे देखील काढली आहेत. यात 'डीपवर्क', 'माऊंट जीम' (शाम भुर्के), 'यशस्वी कसे व्हावे', 'असे घडवा भविष्य', 'बियाँड 20 -20' (डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम), 'यू विल क्राय- व्हेन यु डाय' (रॉबीन शर्मा), 'माकडमेवा' (द. मा. मिरासदार), 'जगावे कसे' (शिवराज गोरले) आदी पुस्तकांचा समावेश आहे. सध्या तो स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखीत '1957 स्वातंत्र्य समर' हे पुस्तक वाचत आहे.

शासनाची एन. एम. एम. एस. ही शिष्यवृत्ती परीक्षा चैतन्यने उत्तीर्ण केली. दरमहा हजार रुपयांप्रमाणे 5 वर्षे त्याला 60 हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.घरची आर्थिक परिस्थिती गरीबीची असली म्हणून काय झाले, ज्ञानाची श्रीमंती त्यापुढे फिक्की आहे. याच ज्ञानाच्या शिदोरीतून चैतन्यचे आयुष्याचे ध्येय मोठे आहे. जीवनात काही तरी बनवून दाखवायचे, हेच स्वप्न चैत्यनने उराशी बाळगले आहे.

वाचनवेड्या चैतन्यला लागली मदतीची आस!

वाचनवेड असलेला चैतन्य भ्रमणध्वनीवर अभ्यासाचे यु ट्युब पाहतो. पुस्तक वाचनासह यु ट्युब चलचित्रातून तो स्वतःच टीपणं काढतो. वर्गातील अभ्यासाचे स्वतंत्र नोट्स काढतो. असा हा वाचनवेडा चैतन्य ज्ञानातून स्वतःला घडविण्याचा प्रयत्न करीत आहे. या गरीब, पण मनाने श्रीमंत असलेल्या विद्यार्थ्याला मदतीचा हात निश्चितपणे द्यायला हवा.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news