अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात नगर शहरासह भिंगार उपनगरात वसलेल्या अहमदनगर छावणी परिषद क्षेत्राचा समावेश होतो. नगर शहर पश्चिमेला सीना नदी व पूर्वेला लष्करी संस्थांना आहे. छावणी परिषदेच्या अटीशर्तीमुळे विविध विकासकामे करताना लष्करी संस्थांची परवानगी घ्यावी लागते. सामान्य नागरिकांना ही प्रक्रिया पार पाडणे शक्य होत नाही. त्यामुळे भिंगार छावणी परिषदेच्या विविधप्रश्नी केंद्र सरकारने तोडगा काढावा, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याकडे केली.
निवेदनात म्हटले आहे, की एखाद्याला लष्करी आस्थापनांजवळ एक मजली इमारत बांधायची असल्यास 100 मीटर आणि बहुमजली इमारतीसाठी 500 मीटर अंतर राखणे आवश्यक आहे. कडक नियमांमुळे नागरिकांना त्या जागांचा विकास योग्य प्रकारे करता नाही. तसेच भिंगार येथील बेल्हेश्वर मंदिरात दररोज भाविकांची गर्दी असते. भिंगार ओढा परिसरात वीर गोगादेव महाराज मंदिरातही भाविकांची गर्दी असते. परंतु, सुरक्षेसह अन्य कारणामुळे मंदिर वर्षांतून अनेकवेळा बंद ठेवले जाते. ही मंदिरे नेहमी खुले ठेवण्याची भाविकांची मागणी आहे.
अहमदनगर शहराचा विकसनशील भाग असल्याने येथे मोठ्या प्रमाणात इमारती व व्यापारी संकुले असून छावणी परिषदेच्या काही नियमांमुळे येथे नागरी व विकासाच्या समस्या आहेत. या भागात परवानगी दिल्यास या भागाच्या विकासासाठी त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. नागरिकांना सुविधा देण्यासाठी कर्मचार्यांची संख्या खूपच कमी आहे. या भागाच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळण्याची अपेक्षा असतानाही शासनाकडून पुरेसा निधी मिळत नाही. परिणामी, विकास कामास विलंब होत आहे. छावणी परिषद संचलित रुग्णालयात नागरिकांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची संख्या नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे.
हेही वाचा