अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा ‘बाजार बंद’! लम्पीचा हाहाकार | पुढारी

अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा ‘बाजार बंद’! लम्पीचा हाहाकार

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढताच आहे. आजपर्यंत 2641 जनावरे बाधित झाली असून, यातील 185 जनावरांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी पशुसंवर्धन विभागास प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सूचना करतानाच, अहमदनगर जिल्हा हा बाधित क्षेत्र व सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. त्यानुसार जनावरांचा बाजार बंद करण्यात आलेला आहे. गेल्या महिनाभरापासून लम्पीचा हाहाकार वाढला आहे. बाधित आणि मृत जनावरांचा आकडा दररोज वाढतोच आहे.

गुरुवारपर्यंत जिल्ह्यातील 422 गावांतील 2641 जनावरे लम्पीने बाधित झालेली आहेत. यापैकी 1516 जनावरे बरी झाली असून, 940 जनावरांना उपचार सुरू आहेत. यातील 76 जनावरे मात्र अत्यवस्थ असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी सालीमठ यांनी काही दिवसांपूर्वीच लम्पीबाबत ठोस निर्णय घेतले आहेत.

तसा आदेश काढून लम्पी बाधित क्षेत्रात जनावरांची ने-आण करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. लम्पी प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणापासून 20 किलोमीटरवर जनावरांचा बाजार भरविणे, शर्यत लावणे, प्राण्यांची जत्रा भरविणे, प्राण्यांचे प्रदर्शन भरविणे यास मनाई करण्यात आलेली आहे. यासह मृत जनावरांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे, लसीकरण, गोठ्यातील स्वच्छता, याबाबतही त्यांनी पशुसंवर्धन विभागाला सूचना केल्याची माहिती उपायुक्त सुनील तुंबारे यांनी दिली.

हेही वाचा

अहमदनगर : शाळकरी मुलीची छेडछाड; आरोपीला पुण्यात अटक

पुण्यातील गोल्ड बॉय रिलस्टारकडून सराईताने उकळली खंडणी; बदनामी करण्याची दिली धमकी

लवंगी मिरची : आनंद गगनात मावेना..!

Back to top button