संगमनेर, पुढारी वृत्तसेवा : तुम्ही काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते असताना महाराष्ट्रातील काँग्रेस सांभाळण्याची मोठी जबाबदारी तुमची होती. मात्र, त्यावेळी तुम्हीच खिंड सोडून पळून गेले होते. त्यामुळे माझ्यावर तुम्ही जे आरोप केले त्यात किती तथ्य आहे, असे प्रत्युत्तर बाळासाहेब थोरात यांनी महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे. बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये खूप मोठे राजकारण झाले. त्यानंतर तब्बल दीड महिन्यानंतर आमदार बाळासाहेब थोरात यांचे संगमनेरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी हार घालून आणि २१ तोफांच्या सलामी देत जंगी स्वागत करण्यात आले.
बाळासाहेब थोरात म्हणाले, तुम्ही महाराष्ट्राचे मंत्री आहात तुमच्याकडून महाराष्ट्राला शान वाटेल असे काम होणे अपेक्षित आहे. मात्र, तुम्ही जिल्ह्यामध्ये दहशतीचे राजकारण करत कार्यकर्त्यांना वेठीस धरण्याचे काम सुरू आहे. परंतु, एक दिवस जनताच हे तुमच्या दहशतीच्या राजकारणाचे झाकण उडविण्याचे काम केल्या शिवाय राहणार नाही.