नागपूर; पुढारी वृत्तसेवा : देशभरातील आयआयटी आणि इतर प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी जेईई मेन्स ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. नुकताच या परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये महाज्योतीतर्फे घेण्यात येत आलेल्या जेईई मेन्स प्रशिक्षण योजनेतील १३ विद्यार्थी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय महाज्योतीला आणि त्या माध्यमातून शिकवत असलेल्या सर्व प्रशिक्षक वर्गास दिलेले आहे. महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले, अध्यक्ष अतुल सावे यांनी जेईई मेन्स परीक्षेत उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
उमरेड येथील विद्यार्थी संकेत वांदिले म्हणाला, जेईई मेन्स परीक्षा पास करने माझे स्वप्न होते. यासाठी लागणारे महागडे क्लासेस लावणे शक्य नव्हते. महाज्योतीच्या वेबसाइटवरुन मला जेईई मेन्स या प्रशिक्षण योजनेची माहिती मिळाली. यात मी ऑनलाईन अर्ज दाखल केला. आणि माझी निवड झाली. या प्रशिक्षण योजनेमार्फत ऑनलाईन क्लासेससाठी मोफत टॅबसह, मोबाईल डेटा देण्यात आला. सर्व विषयांचा पुस्तकांचा एक संचही घरपोच देण्यात आला. ऑनलाईन क्लासेसची, पुस्तकांची, प्रशिक्षकांची जेईई मेन्स प्रशिक्षणास खुप मदत झाली. आज मी 95 ट्क्के मार्क घेऊन पास झालो. माझे इंजिनिअर बनण्याचे स्वप्न साकार झाले.
नागपूर येथील अंश येलोरे म्हणाला, इंजिनियर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून मी शिकत होतो. मित्राकडून महाज्योतीच्या जेईई मेन्स या प्रशिक्षण योजनेची माहिती मिळाली. यात मी ऑनलाईन अर्ज दाखल केला. आणि माझी निवड झाली.आज मी 90 ट्क्के मार्क घेऊन पास झालो. माझे इंजिनिअर बनण्याचे स्वप्न साकार झाले. महाज्योती बहुजन विद्यार्थ्यांचे स्वप्न घडवणारी संस्था असल्यावर भर दिला.