

नगर : ऋतुजाला आई नीता भोसले यांनी लॉन टेनिस खेळण्यासाठी प्रेरित केले आहे. पोलिस अधिकारी असल्याने मी कायम नोकरीनिमित्त वेगवेळ्या ठिकाणी राहात असल्याने तिच्या खेळावर परिणाम होऊ नये, म्हणून आईने विशेष काळजी घेतली. तसेच तिच्याबरोबर पुण्यात राहण्याचाही निर्णय घेतला. ऋतुजाच्या यशात महत्त्वाचा वाटा हा आईचा असल्याचे वडील पोलिस उपअधीक्षक संपत भोसले यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना सांगितले. (Asian Games 2023 )
ऋतुजा भोसले हिने चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत मिश्र दुहेरीत सुवर्णपदक पटकावले. तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडुलकरने ट्विट करीत ऋतुजाच्या सुवर्णकामगिरीचे कौतुक केले आहे. (Asian Games 2023 )
ऋतुजा भोसले ही मूळची सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील लवंग गावची रहिवासी असून तिचे आठवीपर्यंतचे शिक्षण नगरवाला स्कूल, पुणे याठिकाणी झाले आहे. तर पुढील बारावीपर्यंतचे शिक्षण पुण्यातील बीएमसीसी ज्युनिअर कॉलेज येथून झाले. यानंतरचे शिक्षण अमेरिकेतील टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटीची 100 टक्के स्कॉलरशिप मिळवून तिने तेथून लॉन टेनिसबरोबर उच्च शिक्षणही पूर्ण केले. या चार वर्षांत परदेशात शिक्षण घेतल्यांनतर ऋतुजा आपल्या मायदेशी परतली. यानंतर तिने मानांकन स्पर्धेत सहभाग घेत यशाचे शिखर पादाक्रांत केले. आशियाई स्पर्धेतील तिचे हे पहिलेच यश आहे. याआधी तिने आंतराष्ट्रीय स्पर्धेतून चांगले यश मिळविले आहे. सोलापुरात 2021 मध्ये झालेल्या मानांकित आंतराष्ट्रीय स्पर्धेत विजेती ठरली होती. यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. (Asian Games 2023 )
लॉन टेनिसमधील गुरू
मायदेशी परतल्यानंतर लॉन टेनिस या खेळावर ऋतुजाने पूर्ण लक्ष केंद्रित केले. यासाठी तिने वेळोवेळी विविध प्रशिक्षकांचे मार्गदर्शन घेतले. यामध्ये नंदन बाळ, संदीप कीर्तने, हेमंत बेंद्रे यांचे मार्गदर्शन लाभले. पुण्यातील केदार शहा यांच्या मुशीत ऋतुजाला लॉन टेनिस खेळातील पैलू पडले. यानंतर तिने अनेक मानांकन स्पर्धेत सहभाग घेत आपला यशाचा आलेख उंचावला.
सुवर्णपदक पटकावल्यानंतर पहिला फोन मी वडिलांना केला. त्यावेळी माझ्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले होते. मला तर आनंद झालाच होता; परंतु माझ्या आईचे स्वप्न पूर्ण झाल्याचा एक वेगळाच आनंद होता.
– ऋतुजा भोसले
वडील म्हणून आनंद आहे. मुलांचे यश हेच आई-वडिलांचे यश आहे. मुलांनी चांगले लक्ष्य साध्य करणेे यातच आनंद आहे. यशाचा आर्धा टप्पा पार केला असून पुढचे यश अजून साध्य करायचे आहे. हे यश निश्चित साध्य करेल, अशीच अपेक्षा. आता पुढचे लक्ष्य ऑलिम्पिक आणि ग्रँडस्लॅम आहे. कोणताही ताणतनाव न घेता तिने खेळत राहावे इतकीच अपेक्षा.
-संपतराव भोसले, पोलिस उपअधीक्षक, नगर ग्रामीण
हेही वाचा :