नगर : पुढारी वृत्तसेवा : दबाव तंत्राने करुन घेतले जाणारे ऑनलाईनचे काम बंद करावे, यासाठी जिल्ह्यातील आशा वर्कर व गट प्रवर्तकांनी बुधवारी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदेवर मोर्चाने येऊन बेमुदत संपाची हाक दिली. मोर्चाचे निवेदन राष्ट्रीय ग्रामीणचे नियंत्रक अमोल शिंदे व जिल्हा समन्वयक संज्योत उपाध्ये यांना देण्यात आले. आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात जोरदार निदर्शने करून धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील 3200 आशा सेविका व 190 गट प्रवर्तक संपावर गेले आहे. जोपर्यंत ऑनलाईनचे काम काढून घेतले जात नाही, तोपर्यंत संप सुरू राहणार असल्याचा आक्रमक पवित्र घेण्यात आला आहे.
बुरुडगाव येथील भाकपच्या कार्यालयापासून मोर्चाची सुरुवात झाली. जुने बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चा जिल्हा परिषदेत धडकला. या आंदोलनात आयटकचे राष्ट्रीय सदस्य कॉ. अॅड. सुधीर टोकेकर, संघटनेच्या अध्यक्षा सुवर्णा थोरात, मार्गदर्शक कारभारी उगले, जिल्हा संघटक कॉ. सुरेश पानसरे, कॉ. निवृत्ती दातीर, कॉ. उषा अडांगले, आशा देशमुख, वर्षा चव्हाण, जयश्री गुरव, अश्विनी गोसावी आदी सहभाागी झाले होते.
संबंधित बातम्या :
आशा वर्कर या कमी शिकलेल्या असून, त्यांना इंग्रजीचे पुरेसे ज्ञान नाही. आयुष्यमान भारत व गोल्डन कार्ड संबंधित इंग्रजीमध्ये ऑनलाईन माहिती भरणे अत्यंत किचकट व अवघड आहे. अनेक आशांकडे स्मार्ट फोन देखील नसल्याने या कामासाठी त्यांना अडचणी येत आहे.
या कामाचा योग्य मोबदला देखील त्यांना दिला जात नाही. आशा वर्कर यांना हे काम करण्यासाठी दडपण आणले जाते व बळजबरीने काम करून घेतले जात असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.