

अहमदनगर; वृत्तसेवा : नेवासा तहसीलदार यांना झालेल्या मारहाणीचा जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. भारतीय दंड विधान कलम 353 मध्ये नव्याने केलेल्या सुधारणा तत्काळ रदृ करुन पूर्वीच्या तरतुदीची पुर्नस्थापना करण्यात यावी. मारहाण करणार्या व्यक्तींना तत्काळ अटक करा अन्यथा जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने कामबंद आंदोलन केले जाईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.
तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांना मारहाण होताच जिल्हा महसूल कर्मचारी संघटना आक्रमक झाली. संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब डमाळे, उपाध्यक्ष कैलास साळुंके व सरचिटणीस अक्षय फलके यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी नेवासा येथील घटनेचा निषेध करीत निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना निवेदन दिले. हे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्याची विनंती केली.
सरकारी कामकाज करताना महसूल अधिकार्यांसह कर्मचार्यांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. नेवासा तहसीलदार बिरादार यांना केलेली मारहाण निषेधार्थ आहे. यापूर्वी श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव येथील तलठ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. तत्कालीन कर्जत उपविभागीय अधिकारी डॉ. अजीत थोरबोले, श्रीरामपूर येथे जिल्हा खणिकर्म अधिकारी यांच्यावर देखील हल्ले झाले आहेत. वाढत्या हल्ल्यामुळे महसूल अधिकारी व कर्मचारी धास्तावले आहेत.
अधिकारी व कर्मचारी यांच्या संरक्षणासाठी भारतीय दंड विधान कलम 353 लागू होते. परंतु या कलमात लोकप्रतिनिधींनी सुधारणा करण्याची मागणी करुन संरक्षक कवच काढून घेतले आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचार्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे कलम 353 मधील तरतुदीची पुनर्स्थापना करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी संघटनेच्या पदाधिकार्यांसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा