नगरमध्ये पंतप्रधान आवास योजनेचा अधिकारी सतरा हजाराची लाच घेताना ताब्यात

नगरमध्ये पंतप्रधान आवास योजनेचा अधिकारी सतरा हजाराची लाच घेताना ताब्यात

संगमनेर (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर शहरातील मोगलपूरा येथील लाभार्थ्याकडून पंतप्रधान घरकुल योजनेतील नगरपालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या घरकुलांची कामे करणा-या ठेकेदाराकडून अधिकाऱ्याने पहिल्या हप्त्याचा धनादेश प्राप्त करण्यासाठी तक्रारदाराकडे लाच मागितली होती. संबंधित अधिकाऱ्याला याच परिसरातील एका तांदळाच्या दुकानामध्ये १७ हजार रुपयाची लाच स्वीकारताना सापळा लावून बसलेल्या नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस पथकाने रंगेहाथ पकडले. केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेतर्गत शहरी आणि ग्रामीण भागातील गोरगरिबांना घरकुल देण्याची योजना सुरू आहे.

संगमनेर नगरपालिकेअंतर्गत शहरात अनेक ठिकाणी घरकुल योजनेचे कामे सुरू आहे. त्यासाठी शासनाच्या वतीने दिलेल्या एजन्सीच्या मार्फत ठेकेदाराची नेमणूक केली आहे. अन त्या ठेकेदाराकडून विकास जोंधळे याने  योजनेच्या कामकाजासाठी लाच मागितली.
संगमनेर शहरातील मोगलपूरा भागात एका लाभार्थ्याने घरकुलासाठी विकास जोंधळे या अधिकाऱ्याकडे अर्ज दिला होता. तो मंजूर होवून आल्यानंतर अनुदानाच्या पहिल्या हप्त्याचा धनादेश लाभार्थ्याला देण्यासाठी विकास जोंधळे याने तक्रारदाराकडे १७ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानुसार तक्रारदाराने या अधिकाऱ्याच्या संदर्भात नाशिकलाच लाचप्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली.  त्यानुसार मंगळवारी सायंकाळी मोगलपूर्‍यातील एका तांदळाच्या दुकानात लाचेची रक्कम देण्याचे ठरले होते.

नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे यांनी आपल्या पथकासह संगमनेरात येवून मोगलपुर्‍यात सापळा रचला होता. ठरल्या प्रमाणे लाचखोर विकास सुरेश जोंधळे (रा.कोकणगाव, ता.संगमनेर) तेथे आला आणि त्याने तक्रारदाराकडून १७ हजार रुपयाची लाच स्वीकारली. त्याचवेळी आसपास दबा धरुन बसलेल्या एसीबी च्या पथकातील पो.नि.साळुंखे यांच्यासह हवालदार पंकज पळशीकर, पोलीस नाईक प्रकाश महाजन, चालक पोलीस नाईक परशुराम जाधव यांच्या पथकाने झडप घालीत त्याला रंगेहाथ  पकडले. याबाबत रात्री उशिरापर्यंत संगमनेर शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news