अहमदनगर जिल्हा परिषदेत 122 वारसांना नोकरी

अहमदनगर जिल्हा परिषदेत 122 वारसांना नोकरी

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेत सेवेत असताना दिवंगत झालेल्या कर्मचार्‍यांच्या 122 वारसांना सोमवारी ज्येष्ठतेनुसार वर्ग 3 आणि वर्ग 4 मधील पदांवर पदस्थापना देण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी शैक्षणिक पात्रतेनुसार, पारदर्शीपणे व समुपदेशनाने ही आदर्श भरती प्रक्रिया राबविल्याने उमेदवारांच्या चेहर्‍यावर समाधान पाहायला मिळाले.

जिल्हा परिषदेतील अनुकंपा भरतीत सर्वप्रथम यापूर्वी गट 'क'मधील अर्हता धारण करणारे परंतु जागा उपलब्धतेअभावी गट 'ड'मध्ये पदस्थापना दिलेले एकूण 11 कर्मचारी यांना गट 'क' संवर्गातील रिक्त पदे उपलब्ध झाल्याने प्राधान्याने तेथे पदस्थापना देण्यात आली. उर्वरित प्रतीक्षा यादीतील एकूण 122 उमेदवारांना नियुक्त्या देण्यासाठी सोमवारी सकाळी प्रक्रिया सुरू झाली होती. यात वर्ग 3 व वर्ग 4 पदांवर नेमणुका देण्यात आल्या आहेत.

122 उमेदवारांना थेट पदस्थापना करून नेमणुका देण्यात आलेल्या असून समुपदेशन प्रक्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांचे नियंत्रणाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांचे मार्गदर्शनाखाली व विभागप्रमुख डॉ. संदीप सांगळे, पांडुरंग गायसमुद्रे, श्रीरंग गडधे आदी विभागप्रमुखांच्या उपस्थितीत राबविण्यात आली आहे. प्रतीक्षा यादीतील सर्वच पात्र उमदेवारांना पदस्थापना देण्यात आल्याने संबंधितांनी समाधान व्यक्त केले. विशेष म्हणजे अटी व शर्थीचे पालन करून 100 टक्के अनुकंपा नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय मागील काही भरतीच्या तुलनेत ही भरती प्रक्रिया सर्वच पातळीवर आदर्शवत राबविल्याचे कौतुक अनेकांनी केले. अनेक उमेदवारांनी सीईओ व प्रशासनाचे आभार मानले.

अशी मिळाली पदस्थापना
कनिष्ठ सहायक ः 24
वरिष्ठ सहायक ः 10
वरिष्ठ सहायक लेखा ः 4
पर्यवेक्षिका ः 9
कनिष्ठ अभियंता ः 9
स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ः 12
ग्रामसेवक ः 3
आरोग्य सेवक ः 43
औषध निर्माण अधिकारी ः 4
परिचर ः 10
प्रयोगशाळा तंत्रज्ञ ः 1
कनिष्ठ अभियंता विद्युत ः 2
विस्तार अधिकारी ः 1

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news