वाळकी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नगर – सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामात केल्या जाणार्या खोदाईचा फटका बुर्हाणनगर पाणी योजनेला बसत असून, या कामातील हलगर्जी पणामुळे पाणी योजनेची जलवाहिनी ठिकठिकाणी फुटून परिसरातील गावांचा पाणीपुरवठा काही दिवसांपासून खंडित होत आहे.
याबाबत शिवसेनेने आक्रमक होत वाकोडी फाट्यावर शनिवारी (दि.3) आंदोलन करत काही काळ काम बंद पाडले. शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी दत्तात्रय खांदवे, अमोल उध्दव तोडमल, भाऊ बेरड, सरपंच अमोल संपतराव तोडमल, ज्ञानेश्वर कोरडे, दत्ता वाघ, महेश म्हस्के आदी उपस्थित होते.
सोलापूर राष्ट्रीय महामार्गवरील वाकोडी फाटा, दरेवाडी, वाळुज-पारगाव, शिराढोण, दहिगाव, साकत खुर्द, वाटेफळ, रुईछत्तिसी, हातवळण, गुणवडीसह इतर गावांना बुर्हाणनगर प्रादेशिक पाणी योजनेतून पाणी पुरवठा होतोे. पंरतु, गेल्या दिड वर्षांपासून नगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण काम चालू आहे. या खोदकामात ही पाईप लाईन वारंवार फुटते. यामुळे नगर तालुक्याच्या दक्षिण भागातील 10 ते 15 गावांचा पाणी पुरवठा विस्कळीत होतो. या गावांना पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण होत आहे. ही योजना असल्याने शासन या गावांना टँकर मंजूर देत नाही.
केंद्रिय विद्यालया जवळ पाईपलाइन फुटली त्या ठिकाणी खोदकाम बंद पाडले. यावेळी नगर-सोलापूर रस्त्याच्या कामा संदर्भात नेमणूक केलेले संपर्क अधिकारी अमोल बोबडे यांनी ही पाईपलाईन तातडीने दुरुस्ती करण्याचे व पाईपलाईन दुरुस्त होईपर्यंत खोदकाम बंद करण्याचे लेखी आश्वासन दिले.
हेही वाचा