राहुरी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : म. फुले कृषी विद्यापीठाचे 5 वाण, 3 कृषी यंत्रे अवजारे व 69 पीक उत्पादन तंत्रज्ञान शिफारशींना मान्यता मिळाली. यामध्ये भात-फुले कोलम, भात-फुले सुपर पवना, मका-फुले उमेद, मका-फुले चॅम्पीयन, ऊस-फुले 13007 हे वाण प्रसारीत करण्यात आले. ट्रॅक्टर चलीत फुले ऊस पाने काढणी व कुट्टी यंत्र, विद्युत मोटार चलीत फुले भुईमुग शेंगा फोडणी, वर्गवारी यंत्र व फुले रस काढणी यंत्र प्रसारीत केल्याची माहिती म. फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार यांनी दिली.
पुणे येथील महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद व राहुरीचे म. फुले कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राहुरी कृषी विद्यापीठ येथे तीन दिवसीय संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीची 51 वी बैठक पार पडली. यावेळी म. फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक संशोधन डॉ. गोरंटीवार यांच्या नेतृत्वाखाली कृषी विद्यापीठाचे नवीन वाण व तंत्रज्ञान शिफारशी सादर केल्या. त्यास समितीने मान्यता दिली.
प्रसारीत केलेले वाण असे,
1. भात-फुले कोलम : भाताचा फुले कोलम (व्ही.डी.एन.-1832) हा अधिक उत्पादन देणारा निमगरवा, आखूड बारीक दाण्याचा वाण पश्चिम महाराष्ट्रात लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला.
2. भात-फुले सुपर पवना : भाताचा फुले सुपर पवना (आयजीपी-13-12-19) हा अधिक उत्पादनक्षम, बुटका, निमगरवा, सुवासीक, लांबट बारीक दाण्यांसह तांदळाची उत्तम गुणवत्तेचा वाण पश्चिम महाराष्ट्रात खरीप हंगामात लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला.
3. मका-फुले उमेद : मका पिकाचा फुले उमेद (क्युएमएच-1701) हा अधिक धान्य उत्पादन देणारा व मध्यम कालावधीत पक्व होणारा संकरीत वाण महाराष्ट्र राज्यात खरीप हंगामात लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला.
4. मका-फुले चॅम्पीयन : मका पिकाचा फुले चॅम्पीयन (क्युएमएच-1819) अधिक उत्पादन देणारा, लवकर पक्व होणारा संकरीत वाण महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामात लागवडीस प्रसारित करण्यात आला.
5. ऊस- फुले 13007 : फुले ऊस-13007 हा ऊस पिकाचा वाण राष्ट्रीय पातळीवर द्विपकल्पीय प्रदेशासाठी प्रसारित करण्यात आला आहे.
प्रसारीत केलेली यंत्रे अशी, 1 उसाची पाने काढणे व कुट्टी करण्यासाठी ट्रॅक्टरचलीत फुले ऊस पाने काढणी व कुट्टी यंत्र प्रसारित करण्यात आले.
2. भुईमुग शेंगा फोडणे, शेंगदाणे, फुटके शेंगदाणे, शेंगा व टरफले वेगवेगळे करण्यासाठी विद्युत मोटारचलीत फुले भुईमुग शेंगा फोडणी व वर्गवारी यंत्र प्रसारित करण्यात आले.
3. फळे व भाज्यांमधुन रस काढण्यासाठी फुले रस काढणी यंत्र छोट्या प्रक्रिया उद्योजकांसाठी प्रसारीत करण्यात आले.