

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दमदार पाऊस झाला. या पावसाने जिल्ह्याची टक्केवारी वाढण्यास मदत झाली. सरासरी 92 टक्के पावसाची नोंद झाली. मात्र श्रीरामपूर, राहुरी, राहाता, कोपरगाव, संगमनेर व नेवासा या तालुक्यांत पावसाची सरासरी कमी आहे. श्रीरामपूर, राहुरी, संगमनेर राहाता व कोपरगाव या तालुक्यांची परिस्थिती अधिकच बिकट आहे. त्यामुळे दिवाळीनंतर या तालुक्यांत पाणीटंचाईचे संकट डोकेवर काढण्याची शक्यता बळावली आहे. यंदाच्या पावसाने चांगलाच गुंगारा दिला. तीन महिन्यांत सरासरी 193 मि.मी. पावसाची नोंद होती.
मात्र, या तीन महिन्यांत दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे नदी, नाले वाहिले गेले नाहीत. सप्टेंबर महिन्यात मात्र 217 मि.मी. पाऊस झाला. त्यामुळे पावसाची सरासरी 410.1 मि.मी. झाली. याचा फायदा रब्बी पेरणीसाठी होणार आहे. इतर ठिकाणी मात्र, भूजलपातळीत वाढ झाली नसल्याने यंदा डिसेंबर महिन्यापासूनच टँकर धावताना दिसण्याची शक्यता आहे.
श्रीरामपुरात फक्त 47 टक्के पाऊस
श्रीरामपूर तालुक्यात फक्त 47.2 टक्के पाऊस झाला. राहुरीत 64.2, राहाता, कोपरगाव तालुक्यांत 72, तर नेवासा तालुक्यात 85 टक्के पाऊस झाला. दमदार पावसाअभावी या तालुक्यात नद्या, ओढे वाहिले गेले नाहीत. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील पठारी भाग, श्रीरामपूर, राहुरी, कोपरगाव तालुक्यांत दिवाळीनंतर पाणीटंचाईच्या झळा सुरू होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :