

पारनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील एका गावातील तरूणीला अंधश्रद्धेला बळी पाडत अत्याचार करून लैंगिक छळ केल्याप्रकरणी पारनेर पोलिसांनी भोंदूगिरीबाबा विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. योगी महादेवनाथ उर्फ ज्ञानदेव तुकाराम कांबळे (वय 42, रा. शिरसू फळ पाटोळे वस्ती,बारामती, जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे.
आपण देवऋषी असून कोणाच्या काही अडचणी असल्यास भविष्य पाहून त्याचे निवारण करतो, असे आरोपीने फिर्यादी तरूणीच्या कुटुंबीयांना भासविले. कुटुंबीयांचे आजारपण दूर करण्यासाठी, तसेच मेंढ्या मरू न देण्यासाठी होम हवन करावा लागेल, तुम्हाला लोकांनी करणी केली आहे. तुमच्या घरासमोर चेडे गोटे आहेत, असे सांगितले.
तसेच, जादूटोणा करण्याबाबत सांगून फिर्यादीचा स्वत:सोबत विवाह झाल्याचे विधी करून फोटो काढण्यास व जादूटोणा करण्यास भाग पाडले. वेळोवेळी साडेपाच लाख रूपये फिर्यादीच्या वडिलांकडून घेऊन आर्थिक फसवणूक केली. तसेच, तरूणी घरी झोपलेली असताना आरोपीने दमदाटी करून एअरगनचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार केला.