नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील रेशनिंगचा तांदूळ गुजरातमध्ये विक्रीसाठी घेऊन जाणारा ट्रक पुरवठा विभागाच्या पथकाने रविवारी (दि.13) पकडला. या कारवाईत सहा लाख 50 हजार रूपये किमतीचा 33 टन रेशनिंगचा तांदूळ व ट्रक (एमएच 23 एयू 7921), असा 31 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पुरवठा निरीक्षक शिवराज पवार यांच्या फिर्यादवरून तिघांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक उद्धव पवार (रा.अंमळनेर, ता. पाटोदा, जि. बीड), सुनील कठाळे (रा.दहिवडी, ता.शिरूर कासार, जि. बीड) व गोकुळ महादेव जाधव (रा.आर्वी, ता. शिरूर कासार, जि. बीड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. रविवारी भल्या पहाटे नगर तालुक्यातील मिरी ते पांढरीपूल रस्त्यावरील खोसपुरी बसस्थानकाजवळ ही करवाई करण्यात आली. खोसपुरी शिवारातून रेशनिंगचा तांदुळ काळ्या बाजारात ट्रकने विक्रीसाठी नेला जात असल्याची माहिती पुरवठा विभागाला मिळाली होती.
त्यानुसार, रविवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पुरवठा विभागाच्या पथकाने मिरीकडून पांढरीपुलाकडे येणार्या ट्रकला थांबवून झाडाझडती घेतली. ट्रकमध्ये रेशनिंगचा तांदूळ असल्याची खात्री झाल्यानंतर पथकाने सुमारे 33 टन तांदूळ व ट्रक असा 31 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. एमआयडीसी पोलिस ठाण्यात तिघांविरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3 व 74 कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात मोठे रॅकेट सक्रिय
जिल्ह्यात रेशनच्या धान्याचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार सुरू असल्याने दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी राजकीय पक्षांनी मागणी केली होती. मात्र, याकडे पुरवठा विभागाकडून डोळेझाक केली जात होती. त्यानंतर हा विषय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यापर्यंत गेल्याने पुरवठा विभागाने ही कारवाई केली आहे.