अहमदनगर : अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यासह 32 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर : अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यासह 32 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : खोटी कागदपत्रे तयार करून सातबारा उतार्‍यावर नावे घेत जमिनीची खरेदी-विक्री केल्याप्रकरणी अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यासह 32 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून, यामध्ये महसूल विभागाच्या अधिकारी-कर्मचार्‍यासह काही खासगी व्यक्तींचा समावेश आहे.

नगर शहराजवळील वडगाव गुप्ता शिवारातील (गट नं.203 क्षेत्र 2 हेक्टर 97 आर) एक हेक्टर 34 आर ही कनिष्ठ महार वतन हाडोळा इनाम वर्ग 6 ची जमीन आहे. ती जुन्या शर्तीवर करण्यासाठी अटी व शर्तीवर तत्कालीन तहसीलदारांनी बेकायदेशीर परवानगी दिली. त्यास तहसीलदार एल. एन. पाटील, तलाठी एल. एस. रोहकले, तत्कालीन मंडल अधिकारी दुर्गे यांनी मदत केली.

तसेच, जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहाराच्या नियमबाह्य फेरफार नोंदी घेऊन उत्कर्ष पाटील व अजित कड यांना मदत केली. तत्कालीन अपर जिल्हाधिकारी व्ही. टी. जरे व उपविभागीय अधिकारी राजेंद्र मुठे यांना सदर आदेश बेकायदेशीर असल्याची माहिती असूनही, त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही. तत्कालीन सहायक दुय्यम निबंधक दिलीप बबन निराली यांनी खरेदी-विक्रीचे बेकायदेशीरपणे दस्त नोंदविले असल्याचे तक्रारदार यांनी अर्जात म्हटले आहे.

सदरची जमीन ही महार वतन हाडोळा इनाम वर्ग 6 ब ची असल्याची माहिती असताना देखील सर्वांनी मिळून खोटी कागदपत्रे तयार केली व जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करून शासनाची फसवणूक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यासह एकूण 32 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे करीत आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news