पुणतांबा : ‘गणेश’कारखान्यासाठी 89% मतदान

पुणतांबा : ‘गणेश’कारखान्यासाठी 89% मतदान
Published on
Updated on

पुणतांबा/ राहाता : पुढारी वृत्तसेवा : उत्तर नगर जिल्ह्यात सहकार क्षेत्रामध्ये लौकीक असलेल्या गणेश सहकारी साखर कारखान्याच्या आज (शनिवारी) झालेल्या निवडणुकीत सरासरी 89 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीसाठी पोलिसांशी किरकोळ शाब्दिक चकमकीचे प्रकार वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडले. 8234 पैकी 7335 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
गणेशच्या निवडणुकीत तिरंगी लढत झाली, मात्र या निवडणुकीत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे, माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात, कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

मतदारांनी आपले मतदान करून कर्तव्य पार पाडले. दरम्यान, उद्या (सोमवारी) राहाता येथे मतमोजणी होणार आहे. अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. गणेश साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी केली होती. अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत गेल्या पंधरा दिवसांपासून राजकीय आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांचे जनसेवा मंडळविरुद्ध माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात व युवक नेते विवेक कोल्हे यांचे गणेश परिवर्तन मंडळ व शेतकरी संघटनेच्या मंडळाने या निवडणुकीत सहभाग घेतला, मात्र खरी लढत जनसेवा परिवर्तन मंडळामध्ये झाली. निवडणुकीनिमित्ताने प्रचाराचा धुराळा उडाला. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी कारखान्याच्या सत्तेसाठी दोन नेते एकत्र आले. विरोधाला विरोध करून निवडणूक सभासदांवर लादली, असा आरोप प्रचारसभांमधून केला.

माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात व विवेक कोल्हे यांनी गणेश परिसरात दहशतीचे राजकारण सुरू आह.े ती दहशत हटवण्यासाठी व गणेशच्या समृद्धीसाठी निवडणुकीत परिवर्तन करा, असे आवाहन सभासद मतदारांना केले होते. झालेल्या निवडणुकीत सर्व पाच गटांमध्ये मतदान केंद्रावर सभासदांचा उत्साह संचारला होता. मंत्री राधाकृष्ण विखे पा., माजी आ. स्नेहलता कोल्हे, माजी मंत्री अण्णासाहेब मस्के, कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, 'महानंद'चे अध्यक्ष राजेश परजणे यांनी मतदान केंद्रांना भेटी दिल्या.

पुणतांबा गटात 1727 पैकी 1574, वाकडी गटात 1623 पैकी 1396, शिर्डी गटात 1632 पैकी 1446, राहाता गटात 1722 पैकी 1572, अस्तगावमध्ये 1456 पैकी 1272 तर ब वर्ग सोसायटीत 100 टक्के मतदान झाले. निवडणुकीनिमित्त पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.
पुणतांबा येथे मंत्री राधाकृष्ण विखे पा., माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी मतदारांचे आभार मानून विजयाचा दावा केला.

वयोवृद्धाचे मतदान

एकरुके येथील मुरलीधर विष्णू गाढवे या 105 वर्षांच्या वयोवृद्ध सभासदाने मतदानाच्या हक्क बजावत लक्ष वेधले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news