चार दिवसांच्या आठवड्याने पर्यावरणालाही होतो लाभ? | पुढारी

चार दिवसांच्या आठवड्याने पर्यावरणालाही होतो लाभ?

लंडन : आठवड्यातील किती दिवस कामाचे असावेत, याबाबत नेहमीच उलटसुलट चर्चा होत असते. भारतासह अनेक देशांमध्ये आता 5 दिवसांवरून 4 दिवसांचा आठवडा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. काही कंपन्यांनी 4 दिवसांचा आठवडा प्रायोगिक तत्त्वावर सुरू देखील केला आहे. यातून येणारा ‘रिझल्ट’ चांगला आहे. यामुळे कर्मचार्‍यांचे काम तर सुधारलंच आहे त्यासोबत याचा पर्यावरणाला मोठा फायदा होत आहे, असा दावा करण्यात येतो.

आता जगभरातून आठवड्यातून चार दिवस काम करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत अनेक संशोधने आणि प्रयोग सुरू आहेत. जपान, न्यूझीलंड, ब्रिटन, अमेरिका, आयर्लंड, स्पेन आणि आइसलँडमध्ये असे प्रयोग करण्यात आले आहेत. बहुतेक प्रयोगांमध्ये परिणाम चांगले दिसत आहेत. आठवड्यातून चार दिवस काम करणार्‍या कर्मचार्‍यांची उत्पादकता वाढण्यासोबतच त्यांच्या प्रकृतीतही सुधारणा दिसून येत आहे.

आता काही संशोधनात असा दावा केला जात आहे की सर्व देशांमध्ये आठवड्यातून चार दिवस काम करण्याची प्रणाली लागू केल्यास कर्मचार्‍यांच्या आरोग्याबरोबरच पृथ्वीच्या आरोग्यालाही फायदा होऊ शकतो. प्रोफेसर जूलियेट शोअर यांनी याबाबत संशोधन करून अहवाल सादर केला आहे. कामावर येणार्‍यांची संख्या तीन दिवस नसेल याशिवाय लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि इतर मशिनमुळे होणारे कार्बनडायऑक्साईड आणि उत्सर्जन हे कमी होईल असा दावा त्यांनी केला आहे. जवळपास 20 टक्के हे उत्सर्जन कमी होत असल्याची नोंद त्यांनी केली.

2025 पर्यंत ब्रिटनमध्ये जर ‘4 डे वीक’ लागू झालं तर 20 टक्के कार्बन उत्सर्जन कमी होईल असा दावा शोअर यांनी केला आहे. संशोधनात असे म्हटले आहे की, घरातून काम करण्याची व्यवस्था वाढवून, वाहतूक कमी करून कार्बन उत्सर्जन कमी करता येऊ शकते. यूके, यूएस आणि आयर्लंडमधील 91 कंपन्या आणि 3,500 कर्मचार्‍यांनी चार दिवसांच्या कामकाजाच्या आठवड्यात सहा महिन्यांच्या कालावधीत दोन चाचण्यांमध्ये भाग घेतला. लंडनस्थित फोर डे वीक ग्लोबल, ऑटोनॉमी थिंक टँक, केंब्रिज युनिव्हर्सिटी आणि बोस्टन कॉलेज यांनी या चाचणीचे निरीक्षण केले.

Back to top button