Jalgaon Crime News | खूनाचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीने व्यापाऱ्याचीही केली फसवणूक

Jalgaon Crime News | खूनाचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीने व्यापाऱ्याचीही केली फसवणूक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – डाळीने भरलेला ट्रक हा नियोजित स्थळी न नेता त्याचा रस्त्यातच विल्हेवाट लावून अफरातफर केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीसांनी ट्रकचालकाला मध्यप्रदेशातून अटक केली आहे. आरोपीला न्यायालयाने ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ट्रक भिवंडीत विल्हेवाट लावण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. आरोपीवर यापूर्वी खुनाचा गुन्हा देखील दाखल आहे.

तिलक रविंद्र काबरा (वय ३१ वर्षे, रा. चैत्रबन कॉलनी, महाबळ परिसर, जळगाव) यांची जळगाव एम. आय. डी. सी. परिसरात असलेल्या सेक्टर नं. एस ३८/३९ मध्ये राधाकृष्ण ॲग्रो इंड्रस्ट्रिज प्रायव्हेट लिमीटेड दालमिल कंपनी आहे. पनवेल जि. रायगड येथे २७ लाख २९ हजार ६७८ रुपये किमतीच्या त्यांच्या कंपनीच्या दाळी या अनिल प्रल्हाद खेडकर (रा. पनवेल ता. जि. रायगड) यांच्या मालकीच्या ट्रेलर क्रमांक डी.डी ०१ एम ९४६५ मध्ये चालक राजासिंग उर्फ राजा अग्निदेवसिंग चौहान (रा. मरसराहा, सीधी, मध्यप्रदेश) हा घेऊन गेला होता. त्यानंतर आरोपीने सदरचा माल हा पनवेल येथे पोहचविलाच नाही. तर सदर मालाची त्याने परस्पर कुठतरी अफरातफर करुन विल्हेवाट लावली होती. त्यामुळे मालक तिलक काबरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा घडल्यानंतर ट्रकचालक राजासिंग चौहान हा पसार झाला असल्याचे त्याचा शोध सुरु होता. या दरम्यान तो सिंधी, मध्यप्रदेश येथे असल्याबाबतची माहिती पोलीस निरिक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्याप्रमाणे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक  दत्तात्रय पोटे, पोलीस अतुल वंजारी, किरण पाटील, विशाल कोळी, राहुल रगडे, साईनाथ मुंढे यांच्या पथकाने पुढील तपास केला. यामध्ये संशयित आरोपी राजासिंग उर्फ राजा अग्निदेवसिंग चौहान यास त्याच्या गावी मरसराह, सिंधी मध्यप्रदेश या ठिकाणाहून जंगलातून स्थानिक पोलीसांच्या मदतीने ताब्यात घेतले आहे.

आरोपीस न्यायमूर्ती वसीम देशमुख यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सहा दिवसाची पोलीस काेठडी सुनावली आहे.  सरकारी वकील ॲड. स्वाती निकम यांनी कामकाज पाहिले. आरोपीने भिवंडी शहरात मालाची विल्हेवाट लावल्याची कबुली दिली असून  राजासिंग चौहान याच्यावर यापूर्वी देखील एका खुनाचा गुन्हा दाखल आहे.

हेही वाचा:

logo
Pudhari News
pudhari.news