ते मंदिरात जातात हेही नसे थोडके ; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरे यांना टोला | पुढारी

ते मंदिरात जातात हेही नसे थोडके ; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरे यांना टोला

पुणे : पुढारी वृत्तसेवा : माजी मुख्यमंत्री व शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दि.22 जानेवारीला कुठल्या तरी मंदिरात चालले आहेत, हेही नसे थोडके. ते मंदिरात जाण्यास तयार झाले आहेत, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी लगावला. पुणे शहर भाजपच्या नवीन मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, महिला आघाडीच्या प्रमुख हर्षदा फरांदे आदी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, श्रीराम मंदिराच्या निमित्ताने घरोघरी अक्षतावाटप हा भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम नाही; तो रामभक्त व कारसेवकांचा कार्यक्रम आहे.

श्रीरामावर श्रद्धा असलेले घरोघरी जाऊन अक्षता देत आहेत. त्याबद्दल कोणालाही दुःख होण्याचे कारण नाही. तसेच, महाविकास आघाडी सरकारचा गृहमंत्री होता, तेव्हा राज्यात सारे आलबेल होते. अंबानींच्या घरासमोर बॉम्ब ठेवला जात नव्हता, तत्कालीन गृहमंत्र्यांवर शंभर कोटींचे आरोप होत नव्हते, साक्षीदारांच्या हत्या होत नव्हत्या, त्यामुळे त्यावर काय उत्तर द्यायचे, अशा उपरोधिक शब्दांत फडणवीस यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

पोलिस शिपायाला मारहाण करणारे भाजपचे आमदार सुनील कांबळे यांच्यावर गृहखात्याचे प्रमुख म्हणून ठोस कारवाई करणार का, असे आव्हान सुप्रिया सुळे यांनी दिले होते. त्यावर सुप्रिया सुळे सांगतात म्हणून कारवाई होत नसते, पोलिस कारवाई करत आहेत, असे उत्तर फडणवीसांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या मेळाव्याच्या बॅनरवर नबाब मलिक यांचे छायाचित्र लावले होते. त्याबाबत विचारणा केली असता, भाजपची भूमिका पक्की असून, त्यापासून आम्ही तसूभरही दूर झालेलो नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.

तलाठी परीक्षेतील गैरव्यवहाराबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुरावा दिल्यास निश्चित चौकशी केली जाईल. नुसत्या विधानाने चौकशी करता येत नाही. राज्यात मोठ्या प्रमाणात पारदर्शकपणे परीक्षा घेण्यात येत असून, कोणत्याही परीक्षेबाबत गैरव्यवहाराचा पुरावा दिल्यास ती रद्द केली जाईल, तसेच त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
                                                                – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री.

Back to top button