पिंपरी: पुढारी वृत्तसेवा : तमाम मराठीजनांना आपल्या दमदार अभिनय आणि संवादफेकीच्या जोरावर खिळवून ठेवणाऱ्या तमाशा कलावंत प्रभा शिवणेकर (वय ८१) यांचे शुक्रवारी(दि.31) पिंपरी परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले. त्यांचे नातू सचिन कदम यांनी आजीचा अखेरपर्यंत सांभाळ केला. १९५०-८०च्या दशकात गाढवाचं लग्न या मूळ वगनाट्यात त्यांनी साकारलेली गंगीची भूमिका अजरामर झाली. राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त वगनाट्यातील गंगीची लाईफटाइम एक्झिट ही मनाला चटका लावणारी असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ यांनी 'दैनिक पुढारी'शी बोलताना व्यक्त केली. ओव्हाळ यांनी प्रभा शिवणेकर यांच्या जीवनावर आधारित एका गंगीची कहाणी हा चरित्रग्रंथ लिहिला आहे.
मराठी साहित्यसम्राट पु.ल. देशपांडे यांनी प्रभा शिवणेकर यांच्या जातिवंत अभिनयाची शिफारस अखिल भारतीय संगीत नाट्य अकादमीकडे केली. त्यानंतर त्यांना १९७४ मध्ये तत्कालीन राष्ट्रपतीच्या हस्ते राष्ट्रीयस्तरावर गौरविण्यात आले. राज्य शासनाच्या विठाबाई नारायणगावकर हा पाच लाखांचा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला होता. प्रभा शिवणेकर यांनी वगसम्राट दादू इंदुरीकर, अभिनय सम्राट शंकरराव शिवणेकर, शाहीर अमर शेख, विठाबाई नारायणगावकर, रघुवीर खेडकर, कांताबाई सातारकर, तुकाराम खेडकर आणि चंद्रकांत ढवळपुरीकर यांच्याबरोबर साकार केलेल्या भूमिका अजरामर झाल्या.
या मराठी कलावंतीण बाईच्या अभिनयाची दखल जपान आणि अमेरिकेलतील कलावंतांनी घेतली. त्यांच्या वगनाट्याला पाहिल्यावर त्यांनी प्रभा यांना भारताच्या 'पॉल मुनी' म्हणून संबोधले. गाढवाचं लग्न पाहिल्यानंतर ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले दाद देत म्हणाल्या होत्या, की गंगी नसती तर दादोबाचा सावळा कुंभारही फिका पडला असता. आर्थिक प्रतिकुलतेच्या काळात प्रभा शिवणेकर यांनी शाहीर अमर शेख यांच्या कलापथकात तीन वर्षे सेवा केली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचे योगदान मोठे होते.
प्रभा शिवणेकर यांनी १०० हून अधिक भूमिका केल्या. झाला उद्धार वाल्मीकीचा, चित्ता फाडला जावळीचा, झाशीची राणी, चोखामेळा, दिल्ली हातातून गेली या समाजप्रबोधनपर वगनाट्यात प्रभा शिवणेकर यांनी साकारलेल्या मूळ भूमिका अजरामर झाल्या.
मुळशी तालुक्यातील भालगुडी हे त्यांचे जन्मगाव असून शुक्रवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
हेही वाचा