वाळूउपशाला स्थगिती; मुळा-प्रवरा पर्यावरण संवर्धन समितीच्या आंदोलनाला यश

वाळूउपशाला स्थगिती; मुळा-प्रवरा पर्यावरण संवर्धन समितीच्या आंदोलनाला यश

नगर : पुढारी वृत्तसेवा : प्रवरा परिसरातील प्रवरा नदीपात्रातील शासकीय वाळूउपसा 3 जूनपर्यंत बंद ठेवण्यात येणार असून, या कालावधीत संपूर्ण वाळूउपशाची चौकशी करण्याचे आश्वासन जिल्हा प्रशासनाने दिले आहे. त्यामुळे मुळा-प्रवरा पर्यावरण संवर्धन समितीने आंदोलन आणि उपोषण चार दिवसांनंतर तूर्त स्थगित केले आहे. जिल्ह्याच्या उत्तरेतील राहाता, राहुरी, संगमनेर व श्रीरामपूर तालुक्यांच्या हद्दीत ठेकेदारांच्या माध्यमातून बेकायदेशीर वाळूउपसा सुरू असून, तो तत्काळ थांबविण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले होते. परंतु कोणतीच कार्यवाही न झाल्याच्या निषेधार्थ मुळा-प्रवरा पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीने शुक्रवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले होते.

उपोषणाच्या चौथ्या दिवशी सोमवारी (दि. 27) अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, जिल्हा गौण खनिज अधिकारी वसीम सय्यद यांच्यासमवेत आंदोलनाचे प्रमुख जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, एकनाथ घोगरे, बाळासाहेब विखे, तसेच उपोषणकर्ते आदिनाथ दिघे, बापूसाहेब दिघे, समितीचे अध्यक्ष भास्कर फणसे आदींची आंदोलन आणि उपोषण थांबविण्यासाठी दोन टप्प्यांत चर्चा झाली. मात्र आंदोलनकर्त्यांना मागण्या मान्य झाल्या नाहीत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष फाळके यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याशी चर्चा केली.

प्रवरा नदीत कोणतीही परवानगी नसताना बोटीने बेसुमार वाळूउपसा सुरू आहे. त्यामुळे पाणी दूषित होऊन जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बेसुमार वाळूउपसा झाल्यामुळे विहिरीची पाणीपातळी खोलवर गेल्याचे फाळके यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले. वाळू वाहतूक ओव्हरलोड होत असल्यामुळे रस्त्यांचे नुकसान झाले. त्यावर अनेक अपघात झाले. त्यामुळे हा वाळूउपसा बंद करून या प्रकरणाची चौकशी करा, अशी मागणी लावून धरली.

दरम्यान, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांचे पत्र गौण खनिज विभागातील अव्वल कारकून कुलथे यांनी सोमवारी रात्री उपोषणस्थळी समितीला सादर केले. '3 जूनपर्यंत वाळूउपसा बंद ठेवण्यात येणार असून, या प्रकरणाची चौकशी केली जाईल,' असे आश्वासन या पत्रात देण्यात आले आहेे. प्रशासनाकडून आश्वासन मिळाल्यामुळे समितीने चार दिवसांनंतर आंदोलन आणि उपोषण तूर्त स्थगित केल्याचे आंदोलनकर्ते अरुण कडू यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news